जुन्नर: करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जुन्नर तालुक्यातील दोन हजार शिक्षक घरोघरी जाऊन सर्व्हे करत आहेत. या प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी निगडी व जुन्नर रोटरी क्लबच्या वतीने कापडी मास्क व सॅनेटायझरचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी गटशिक्षण अधिकारी पांडुरंग मेमाणे, रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीचे अध्यक्ष धनंजय राजूरकर, संतोष काजळे, सचिन ताथेड, तुषार लाहोरकर, रुपेश शाह, चेतन शाह, सुनील जाधव, पवन गाडेकर व शिक्षक वृंद उपस्थित होते.
१२ एप्रिल पासून सुरू झालेल्या या कुटुंब सर्व्हेक्षणात ६० वर्षांवरील व्यक्तींची प्रकृती, २४ मार्च व ७ एप्रिल नंतर शहरातून आलेल्या व्यक्ती, त्यांची लक्षणे आदी माहिती संकलित केली जाते. शिक्षकांनी फिरून जमा केलेली ही माहिती ग्रामसेवकांमार्फत पंचायत समितीमध्ये जाते. तेथून प्रांत कार्यालयात गेल्यावर नव्याने गावांत दाखल झालेल्यांची माहिती संबंधित ठाण्यात पाठवली जाते. मात्र इतके मनुष्यबळ वापरून आलेल्या माहितीवर कारवाई किती प्रमाणात होते, याबाबत अनभिज्ञता आहे. रोजच्या सर्व्हेक्षणाच्या आकडेवारीची माहिती देण्यास अधिकारी असमर्थता दर्शवत आहेत.