बारामतीत बाटली नको खोका दे

मद्यपींनी बॅकलॉग काढला भरून

बारामती : मद्यविक्री परवानगी द्या या मागणीने जोर धरल्याने बारामती शहरातील मद्य विक्रीची दुकाने सुरू करण्यात आली. उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व पोलिस बंदोबस्तात मद्य विक्रीस प्रारंभ झाला. 47 दिवसाच्या प्रतीक्षेनंतर दुकाने सुरू झाल्याने ग्राहकांनी दुकानाबाहेर रांगा लावल्या. काही दुकानदारांनी पहिल्या ग्राहकाचे हार घालून स्वागत केले. काहींनीतर बाटली नको खोका दे म्हणत येथेच्छ दारू खरेदी केली.

राज्यात इतर सर्वत्र मद्य विक्री करण्यासाठी दुकाने खुली करण्यात आली असली तरी बारामती शहरात मात्र मद्यविक्री करण्यास परवानगी देण्यात आली नव्हती. शहरातील काही भागातील कंटेनमेंट झोन बारा तारखेनंतर संपणार असल्याने १२ तारखेनंतरच मद्यपान विक्रीसह सर्व दुकाने सुरू होतील असे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी स्पष्ट केले होते.

मात्र मद्यविक्री परवानगी द्या या मागणीने जोर धरल्याने आजपासून ( दिनांक 6 मे ) दारू विक्री करण्यास परवानगी देण्यात आली. त्यानंतर शहरातील दारू विक्री सुरू झाली. शिस्तीचे पालन करत ग्राहकांनी खरेदी केली. दारू विक्रीवर पुन्हा काही गंडांतर येऊ नये यासाठी दुकानदार तसेच ग्राहकांनी देखील योग्य ती खबरदारी घेतली. दुकानाबाहेर बॅरिगेट्स लावले होते. रांगेत उभा राहून शिस्तबद्ध पद्धतीने गर्दी न करता ग्राहकांनी पहिल्या दिवशी उत्साहात दारू खरेदी केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.