सांगवी -काळेवाडी येथील जलतरणपटू सागर कांबळे याने भारतीयांची मान उंचावण्याची कामगिरी करीत अवघ्या 14 तास 48 मिनिटांत जगप्रसिद्ध इंग्लिश खाडी (34 किलोमीटर अंतर) चौदा अंश सेल्सिअस तापमानात सर केली. या माध्यमातून या युवा जलतरणपटूने आतापर्यंत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
एका वेगळ्या क्रीडाप्रकारात देशाचे नाव सातासमुद्रापार पोहोचवले आहे. अशी कामगिरी करणारा सागर कांबळे हा पिंपरी चिंचवडमधील दुसरा जलतरणपटू ठरला आहे. सागरचे प्रशिक्षक असलेले अमोल आढाव यांच्या रुपात पिंपरी-चिंचवडमधील एकमेव जलतरणपटूने आतापर्यंत इंग्लिश खाडी सर केली आहे. जलतरणपटू सागर यांनी सांगितले, की शालेय जीवनापासूनच पोहण्याची आवड निर्माण झाली.
यातूनच अनेक शाळा, महाविद्यालयांच्या स्वीमिंग स्पर्धांमध्ये यश मिळविले. मात्र, इंग्लिश खाडी सतत खुणावत होती. याबद्दल अनेकांकडून ऐकले होते. इंग्लंडचा दक्षिण किनारा व फ्रान्सचा उत्तर किनारा यामधील अटलांटिकचा भाग इंग्लिश खाडी म्हणून ओळखला जातो. ही खाडी अत्यंत कमी तापमानात सर करणे मोठे आव्हानात्मक होते. अखेर अवघ्या 14 तास 48 मिनिटांत ही खाडी सर करण्यात यश मिळाले. इंग्लिश खाडी सर करण्याचे स्वप्न गेल्या काही वर्षांपासून पाहत होतो. लाटांचा चढ उतार, वारे, थंडी असे अडथळे येत असतानाही 34 किलोमीटरचे अंतर पार करण्यात यशस्वी झालो. आपण हे अंतर यशस्वी पार करू, असा आत्मविश्वास सुरुवातीपासून होता. हा खडतर जलप्रवास होता.
सागरची कामगिरी
सागर हा काळेवाडी येथे वास्तव्यास आहे. वयाच्या आठव्या वर्षांपासून त्याला जलतरणाचे वेड लागले. तेव्हापासून अनेक शालेय, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होत त्याने चमकदार कामगिरी केली. 2015 मध्ये चंडीगड येथे झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत त्याने 4 बाय 200 मीटर रिले प्रकारात रौप्यपदक जिंकले होते. त्याच वर्षी झालेल्या वरिष्ठ राज्यस्तरीय स्पर्धेत सागरने 4 बाय 100 मीटर रिले स्पर्धेत आपल्या संघाला सुवर्णपदक जिंकून दिले होते. 2014 मध्ये झालेल्या वरिष्ठ राज्यस्तरीय स्पर्धेत 200 मीटर बटरफ्लाय स्पर्धेत तो रौप्यपदकाचा मानकरी ठरला होता.