पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पवित्र रमजान महिना मंगळवारपासून सुरू झाला आहे. या काळात खजुराला मागणी वाढली आहे. मार्केट यार्ड भुसार विभागात ४० ते ५० प्रकारचे खजूर उपलब्ध आहेत. याबरोबरच सुकामेव्यालाही मागणी आहे.
सुकामेव्यामध्ये काजू, बदाम, ग्रीन पिस्ता, मनुका, आक्रोड, चारोळे, खारिक आणि केशरला मागणी वाढली आहे. खजुराचे भाव मागील वर्षीच्या तुलनेत स्थिर आहेत. तर, सुकामेवा मागील वर्षीच्या तुलनेत यंदा घाऊक बाजारात १० टक्के स्वस्त असल्याची माहिती दि पूना मर्चंट्स चेंबरचे संचालक आणि सुकामेव्याचे व्यापारी नवीन गोयल यांनी दिली.
येथील बाजारात सौदी अरेबिया, अफगाणिस्तान, इराक, इराणसह विविध अरब राष्ट्रांतून खजूर आणि सुकामेव्याची आवक होत आहे. खजुराचे उत्पादन अधिक झाले आहे. त्यामुळे मागील १५ दिवसांपासून येथील घाऊक बाजारात खजुराची मोठी म्हणजे दररोज सुमारे ५० टन आवक होत आहे. बिया, बिगर बिया, अरेबियन, सौदी, इराणी प्रकरची खजूर उपलब्ध आहे.
पिवळा आणि काळ्या रंगाचा खजूर उपलब्ध
बाजारात पिवळ्या आणि काळ्या रंगाचा खजूर उपलब्ध आहे. पिवळ्यामध्ये जहिदी आणि सुक्री हे दोन प्रकार उपलब्ध आहे. जहिदीच्या लुज मालाला घाऊक बाजारात किलोला ७० ते ८० रुपये, तर पॅकिंगमधील मालाला प्रति किलो ८० ते १५० रुपये भाव मिळत आहे. तर सुक्रीला किलोला २५० ते ३५० रुपये भाव मिळत आहे.
काळ्यामध्ये बुमण, फर्द, सफावी, किमिया, सौदी, सफावी, बरारी, मदिना अशा विविध जाती उपलब्ध आहेत. बुमणला किलोला १२० ते १८० रुपये भाव मिळत आहे. तर उर्वरित सर्व प्रकारच्या खजुराला प्रकारानुसार २५० ते १५०० रुपये भाव मिळत आहे.
सुकामेवा आणि घाऊक बाजारातील किलोचा भाव
काजू – ६०० ते ८०० रुपये
बदाम – ६०० ते ८०० रुपये
ग्रीन पिस्ता – १५०० ते २२०० रुपये
मनुका – १५० ते ३०० रुपये
चारोळी – २२०० ते २५०० रुपये
केशर (१ ग्रॅम) – १५० ते २५० रुपये