कार्ला – विसापूर पायथ्याशी असलेल्या पाटण गावातील विशाल सुनील हरिहर याने एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवत आकाशाला गवसणी घातली आहे. एका भाजी विक्रेत्या महिलेच्या कष्टाचे चिज करत मुलाची वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून निवड झाली आहे. त्याला हे यश मिळवण्यासाठी मोठ्या संघर्षातून मार्ग काढावा लागला आहे.
मळवली गावातील जिल्हा परिषद शाळेत चौथीपर्यंतचे शिक्षण तर माध्यमिक शिक्षण भाजे शांतीदेवी गुप्ता विद्यालय व उच्च माध्यमिक शिक्षण व्ही. पी . एस. लोणावळा येथून पूर्ण केले. घरची परिस्थिती हालखीची असताना जिद्द व चिकाटीच्या जोरावर त्याने यश मिळवले. विशालने आई वडिलांच्या कष्टाचे चिज केले. वडील ट्रक ड्रायव्हर तर आईने गावागावात भाजी विकून या विशालचे शिक्षण पूर्ण केले. तर परिस्थितीची जाणीव असलेला विशाल हा आजी – आजोबांना शेतीची अवजारे तयार करण्यातदेखील मदत करत आहे. विशेष म्हणजे विशाल दहावी व बारावी परिक्षेत शाळेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला होता.
आपला एक भाऊ हुशार आहे. त्यासाठी त्याच्या मोठ्या व लहान भावांनी नोकऱ्या करत आपल्या भावाच्या शिक्षणाला मदत केली. इंजिनियरिग शिक्षण झाल्यानंतर गेल्या सात वर्षांपासून तो अनेक स्पर्धा परीक्षा देत होता.थोड्या गुणांनी त्याचे यश त्याला हुलकावणी देत होते. तर मित्रदेखील त्याला प्रोत्साहन देत त्याची उर्जा वाढवत राहिले.
सात वर्षाच्या अखंड व खडतर प्रवास शेवटी संपला नुकत्याच वनपरिक्षेत्र आधिकारी परीक्षेच्या निकालात त्याची वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून निवड झाली. त्याच्या या यशाबद्दल संपूर्ण मावळ तालुक्यासह लोणावळा मळवली पाटण परिसरातून त्यांच्या यशाची चर्चा सुरु असून त्याचे अभिनंदन केले जात आहे. मावळ तालुक्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करताना विशालची संघर्षमय कहाणी त्यांच्या यशासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.