पिंपरी, (प्रतिनिधी) – जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीचा सर्वांत मोठा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणुकीची रंगत मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघात पहावयास मिळाली. यंदा तीव्र असलेला उन्हाळा पाहता मतदानाची वेळ वाढविण्यात आली होती. सकाळी लवकर मतदान सुरु झाले. यामुळे माॅर्निंग वाॅक आणि व्यायामासाठी बाहेर पडलेले नागरिक आपला मतदानाचा अधिकार बजावूनच घरी परतले.
सकाळी व्यायामासाठी बाहेर पडलेले नागरिकांनी पहिल्याच सत्रात मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीच्या उत्सवास प्रारंभ करुन दिला. निगडी येथील काळभोर गोठा शाळेत मतदान यंत्र बंद पडले. सुमारे दीड तासानंतर मतदान यंत्र बदलून मतदान सुरु करण्यात आले.
लोकसभा निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्याचे मतदान सोमवारी (दि. १३) पार पडले. आहे. मतदान सुरु असताना ईव्हीएम मध्ये तांत्रिक अडचण झाल्याच्या घटना काही ठिकाणी घटना घडल्या. मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातील तळेगाव दाभाडे, खेड राजगुरूनगर या ठिकाणी ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या घटना घडल्या. त्यानंतर निगडी परिसरातील काळभोर गोठा शाळेत देखील ईव्हीएम बंद पडल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर प्रशासनाने मशीन बदलले. यामुळे सुमारे दीड तास मतदान प्रक्रियेचा खोळंबा झाला.
ग्रामीण भागातील मतदार अधिक सजग
मावळ लोकसभा मतदारसंघात पिंपरी, चिंचवड, मावळ, पनवेल, उरण आणि कर्जत हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. पिंपरी, चिंचवड आणि पनवेल हे शहरी भाग आहेत. तर मावळ, उरण आणि कर्जत या मतदारसंघामध्ये ग्रामीण भाग येतात. दुपारी तीन वाजतापर्यंतच्या मतदानाच्या टक्केवारीत उरण आणि कर्जत या दोन मतदारसंघांनी आघाडी घेतली होती.
या तिन्ही मतदारसंघात मतदारसंख्या इतर तीन विधानसभा मतदारसंघांच्या तुलनेत कमी आहे. परंतु येथे उत्साह मात्र शहरी भागांपेक्षा अधिक दिसून येत होता. दुपारी तीन वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान उरण या मतदारसंघात झाले होते. उरणमधील ४२ टक्क्यांहून अधिक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.
विधानसभा – एकूण मतदार – ९ वाजेपर्यंत – ११ वाजेपर्यंत – दुपारी १ वाजेपर्यंत – ३ वाजेपर्यंत – सायंकाळी ५ वाजेपर्यंत – एकूण मतदान (७ वाजेपर्यंत)
पनवेल – ५९१३९८ – ५.२३% – १४.७९% – २६.९३% – ३४.९३% – ००.००% – ००.००%
कर्जत – ३०९२०८ – ५.१५% – १४.२७% – २९.४७% – ३८.०३% – ००.००% – ००.००%
उरण – ३१९३११ – ६.४८% – १७.६७% – २९.६०% – ४२.८९% – ००.००% – ००.००%
मावळ – ३७३४०८ – ३.४१% – १४.७५% – २८.३०% – ३७.५०% – ००.००% – ००.००%
चिंचवड – ६१८२४५ – ६.९०% – १४.९३% – २६.१२% – ३५.१८% – ००.००% – ००.००%
पिंपरी – ३७३४४८ – ४.३३% – १३.०९% – २३.९६% – ३३.७४% – ००.००% – ००.००%