विजय निश्चय मेळाव्यातील जयंत पाटील यांच्या भाषणाकडे लक्ष
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील सोमवारी (दि. ५) व मंगळवारी (दि. ६) फेब्रुवारी रोजी सातारा जिल्ह्यात येत आहेत. सोमवारी पाटण, उंब्रज व कोरेगाव येथे राष्ट्रवादीचा विजय निश्चय मेळावा होणार असून या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसची तोफ म्हणून ओळख असलेले आ. जयंत पाटील काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यामध्ये सातारा लोकसभा मतदार संघातील चार विधानसभा मतदार संघात व माढा लोकसभा मतदार संघातील एका विधानसभा मतदार संघात विजय निश्चय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी पाटण मधील कार्यकर्त्याचा विजय निश्चय मेळावा सकाळी ११ वाजता पाटण येथे,
कराड उत्तर व दक्षिण मधील कार्यकर्त्यांचा विजय निश्चय मेळावा दुपारी २ वाजता आरण्या मंगल कार्यालय उंब्रज येथे तर सायंकाळी ५ वाजता कोरेगाव विधानसभेतील कार्यकर्त्यांचा विजय निश्चय मेळावा गीताई मंगल कार्यालय मार्केट यार्ड कोरेगाव येथे होणार आहे. या मेळाव्यातील आ. पाटील यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
सोमवारी आ.पाटील यांचा मुक्काम सातारा येथे असणार असून या मुक्कामादरम्यान आ. पाटील यांच्या भेटीला कोण कोण येणार याकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. मंगळवारी सकाळी १० वाजता माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा विजय निश्चय मेळावा दहिवडी येथे होणार आहे.