पिंपरी, दि. 28 – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमधील शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकविण्याऐवजी इतर प्रशासकीय कामकाज, शासनाला, पालिकेला विविध माहिती पाठविणे, ही माहिती टाइप करून देणे, अशा विविध कामांसाठी जास्त वेळ जात आहे. त्यामुळे यावर उपाय योजना करण्यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. पालिकेच्या सर्व शाळांसाठी 105 डाटा इंट्री ऑपरेटर कंत्राटी पध्दतीने भरण्यात येणार आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमांच्या एकूण 105 प्राथमिक तर 18 माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये 42 हजार पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थी संख्या मोठी असताना पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षकांची संख्या कमी आहे. त्यामुळे दोन महिन्यापूर्वी पालिकेने सुमारे अडीचशे कंत्राटी शिक्षकांची भरती केली. एकीकडे पालिकेचा शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी विविध उपक्रम राबवत आहे. मात्र, सध्या शिक्षकांना शासन, पालिकेला विविध अहवाल पाठविणे, संच मान्यतेसाठी विद्यार्थ्यांचा डाटा ऑनलाइन भरणे, वैद्यकीय तपासणीची माहिती भरणे, क्रीडा विषय माहिती ठेवणे यासह विद्यार्थ्यांचा सर्व डाटा जतन करणे, संगणकावर एक्सेल सीटमध्ये माहिती भरणे यासह आदी विविध कामे करावी लागत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकविण्याऐवजी प्रशासकीय आणि इतर कामकाजात शिक्षकांचा जास्त वेळ जात आहे. यामुळे शिक्षकांचे मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे. याचा परिणाम थेट विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत आहे. याचा विचार करून प्रशासकीय कामकाज करण्यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाने आता 105 डाटा इंन्ट्री ऑपरेटर कंत्राटी पध्दतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत शिक्षण विभागाचे उपायुक्त संदीप खोत म्हणाले, शिक्षकांचा विविध कामांसाठी बहुमूल्य असा वेळ जात आहे. याचा विचार करून पालिकेच्या सर्व शाळांसाठी 105 डाटा इंन्ट्री ऑपरेटर कंत्राटी पध्दतीने भरण्यात येणार आहेत. यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी आणि त्यांना घडविण्यासाठी जास्तीत-जास्त वेळ देता येणार आहे.