नारायणगाव – जुन्नर तालुक्यात करोना रुग्णाच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असताना हिवरे तर्फे नारायणगाव येथील हॉटेल ओसरा येथे झालेला शाही विवाह सोहळा चांगलाच महागात पडला आहे. वधू-वरासह वरपिता आणि त्यांचे नातेवाईक असे एकूण 22 जण करोना पॉझिटिव्ह आले आहेत.
हॉटेल ओसरा येथे गुरुवारी (दि. 13) हिवरे तर्फे नारायणगाव येथील मुलाचा उंब्रज येथील मुलीशी विवाह झाला. या विवाहात नारायणगाव पोलिसांनी 20 जणांची परवानगी दिली होती; मात्र या 300 पेक्षा अधिक लोकांनी उपस्थिती लावल्याने गोष्ट दुसऱ्या लग्नाची सध्या तालुक्यात चांगलीच गाजत आहे.
वरपिता हे राजकीय व सामाजिक कार्यात कार्यरत असल्याने या विवाह सोहळ्यात 300 पेक्षा अधिक जणांसह आजी-माजी लोकप्रतिनिधी, राजकीय लोक, मोठ्या प्रमाणात मित्रपरिवार उपस्थित राहिल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
या लग्नात अनेक जणांनी सॅनिटायझर व मास्क न वापरल्याचे निदर्शनास आले आहे. या शाही विवाहाची दखल पोलिसांनी 11व्या दिवशी घेऊन गुन्हा दाखल केला आहे.
-
- आपत्तकालीन कमिटीने माहिती लपवली?
जुन्नर तालुक्यात एकूण करोना रुग्णांची संख्या 998 झाली असून एकूण मृत्यू संख्या 43 झाले आहे. हिवरे तर्फे नारायणगाव आपत्तकालीन कमिटीने या लग्नाची माहिती प्रशासनाला देणे आवश्यक असताना सरपंच, ग्राम विकास अधिकारी, पोलीस पाटील व बिट अंमलदार यांनी माहिती लपविल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
- आपत्तकालीन कमिटीने माहिती लपवली?
- वधूच्या आजीचे आठ दिवसांपूर्वीच निधन
या लग्नातील वधूच्या आजीचे 8 दिवसांपूर्वी करोनामुळे मृत्यू झाला आहे. तालुक्यातील नारायणगाव, वारूळवाडी, आळे (आळेफाटा) शिरोली बुद्रुक ही गावे कंन्टेमेंट झोन जाहीर करून ही गावे लॉकडाऊन करण्यात आली आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश गोडे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ यांनी दिली.