#प्रभात_दीपोत्सव_२०२० : एका प्रवाशाची कहाणी

मूळ लेखक : गी द मोपासॉं
अनुवाद : विकास शुक्ल


फ्रेंच साहित्यिक आणि आपल्या लघुकथांसाठी जगभरात गाजलेला गी द मोपासॉं (1850-1893) याच्या Traveler’s Tale या कथेचा हा अनुवाद.

आम्ही कान्सला निघालो तेव्हा गाडीचा डबा पूर्ण भरून गेला होता. सर्वच जण एकमेकांना ओळखत असल्याने बडबड आणि गप्पांना ऊत आला होता. जसं आम्ही तारास्को ओलांडलं, कुणी तरी म्हणालं, “हीच ती जागा आहे ना जिथे माणसांचे खून होतात?’ आणि मग आम्ही सारेच त्या अज्ञात मारेकऱ्याबद्दल बोलू लागलो. गेली दोन वर्षे झाली, एकट्या दुकट्या प्रवाशाला गाठून तो त्याचा खून करी. आजवर तो सापडला नव्हता. प्रत्येक जण आपला तर्क सांगू लागला, मत देऊ लागला. बायका मंडळी थरथर कापत खिडकीबाहेरच्या काळोखात बघू लागल्या. त्या अज्ञात मारेकऱ्याचं अचानक दर्शन होतंय की काय या भयाने घाबरून जाऊ लागल्या. सर्वांच्या गप्पा आपोआपच भयकथा आणि थरारून टाकणारे किस्से या विषयाकडे वळल्या. 

प्रत्येकाजवळ या विषयावर बोलण्यासारखं काही ना काही होतंच. कुणी पराक्रम गाजवून एखाद्या खुन्याला नाहीतर दरोडेखोराला पकडून दिलं होतं. कुणी माहीत नसतांना कुणा भयानक गुन्हेगारासोबत प्रवास केला होता वगैरे वगैरे.

एक डॉक्‍टरसाहेब मात्र बराच वेळपर्यंत गप्प राहून सर्वांचे किस्से ऐकून घेत होते. त्यांची पाळी आल्यावर ते म्हणाले, अशा प्रकारे माझं धैर्य पणाला लावण्याचा योग माझ्या वाट्याला कधी आला नाही. पण हो, माझ्या एका रुग्णाच्या-आता या जगात नाही ती-आयुष्यात मात्र असा एक अद्‌भूत प्रसंग आला होता बुवा! अत्यंत आगळा वेगळा आणि रहस्यमय असा. एक प्रकारे करुण सुद्धा.

मी जिच्याबद्दल बोलतोय ती माझी रुग्ण एका रशियन सरदाराची पत्नी होती. काउंटेस मारी बारानोव्ह हे तिचं नाव. फारच थोर बाई होती ती. अत्यंत देखणी, सौंदर्यवती. तुम्ही तर जाणताच, रशियन महिला किती सुंदर असतात ते! त्याचं ते सरळ नाक, नाजुकसे ओठ, निळसर करड्या रंगाचे त्यांचे ते पाणीदार डोळे आणि त्यांचा तो जरा अलिप्त जरा कणखर वाटणारा दिमाख! अन्य देशांच्या सुंदरींपेक्षा काहीतरी वेगळेपणा त्यांच्या अंगी नक्‍कीच असतो. खोडकरपणा, मादकता, ताकद आणि गोडवा, एकाच वेळी नाजूक आणि कठोर भासणं… आपण फ्रेंच पुरुष तर चटकन भाळतो अशा मोहक रशियन सौंदर्यावर! तर सांगण्याचं तात्पर्य असं की रशियन सुंदरी या वेगळ्याच असतात.

तिच्या डॉक्‍टरांना बरीच वर्षे असा संशय होता की तिला फुप्फुसांचा काहीतरी गंभीर आजार आहे. त्यासाठी तिने फ्रान्सच्या दक्षिण भागात जाऊन उपचार घ्यावेत असा त्यांनी तिच्यामागे लकडा लावला होता. पण सेंट पिट्‌सबर्ग हे आपलं गाव सोडणं तिला मान्य नसल्याने ती त्यांचा सल्ला अजिबात ऐकत नव्हती. शेवटी, गेल्या शिशिर ऋतूत त्यांनी, तिच्या तब्येतीची अवस्था बघून तिच्या नवऱ्याच्या कानावर ही गोष्ट घातली आणि त्यातील धोक्‍याची कल्पना त्याला दिली. त्याने म्हणजे सरदार साहेबांनी फर्मान सोडलं की तिने आत्ताच्या आत्ता दक्षिण फ्रान्समधील मेंटोन या शहराकडे प्रस्थान करावं.

त्याप्रमाणे ती प्रवासाला निघाली. प्रथम वर्गाच्या डब्यात ती एकटीच होती. सोबत तिचा विश्‍वासू वृद्ध सेवक होता जो शेजारच्या दुसऱ्या वर्गाच्या डब्यात मोलकरिणीसोबत होता. ती दाराजवळच बसली होती. डब्याच्या खिडकीतून बाहेरचा देखावा, मागे पडणारी गावं शेतं उदासपणे बघत होती. फारच खिन्न मनस्थितीत होती बिचारी. आपल्या दु:खी आयुष्यावर विचार करत होती. मूलबाळ नाही, कुणी जवळचं नाही, नवरा आहे पण आता प्रेम करेनासा झाला. जगाच्या दुसऱ्या टोकाकडे त्याने तिला एकटीलाच जायला भाग पाडलंय, सोबत आला देखील नाही. एखाद्या आजारी मोलकरणीला दवाखान्यात पाठवावं तसं दिलं तिला पाठवून!

गाडी थांबली की प्रत्येक स्टेशनवर तिचा सेवक इव्हान्स तिच्या डब्यात येऊन आपल्या मालकिणीला काही हवंय का हे बघत होता. खूप जुना आणि अत्यंत विश्‍वासू सेवक होता तो. कमालीचा स्वामिनिष्ठ. तिच्या प्रत्येक आज्ञेचं निष्ठेनं पालन करणारा.

रात्र झाली. गाडी पूर्ण वेगाने धावत होती. थकवा आणि बेचैनपणामुळे तिला झोप येत नव्हती. अचानक तिला आठवलं. गाडी सुटताना तिच्या नवऱ्याने तिच्या हातात कोंबलेली फ्रान्स देशाच्या चलनाची थैली उघडावी आणि त्यात एकूण किती सुवर्णमुद्रा आहेत हे मोजून बघावं असा विचार तिच्या मनात आला.
तिने आपली पर्स उघडली आणि त्यातून पैशाची थैली काढून त्यातील सर्व झळाळत्या सुवर्णमुद्रा आपल्या मांडीच्या खोळीत ओतल्या.

त्याच क्षणी अचानक तिच्या तोंडावर थंडगार हवेचा झोत येऊन आदळला. तिने चमकून वर पाहिलं. डब्याचं दार उघडलं गेलं होतं. घाईघाईने तिने आपल्या मांडीवरील खजिन्यावर एक शाल टाकून त्याला लपवलं आणि काय होतंय याची वाट पाहू लागली. काही क्षणांनंतर रुबाबदार पोषाख केलेला एक माणूस डब्यात अवतरला. बोडका, हात जखमी आणि धापा टाकणारा. त्याने आत येऊन डब्याचं दार लावून घेतलं. बसला. चमकदार डोळ्यांनी आपल्या सहप्रवासीकडे पाहिलं आणि आपल्या रक्‍तबंबाळ मनगटाभोवती हातरुमाल गुंडाळला.

तरूण सरदारपत्नीची भीतीने बोबडी वळली. नक्‍कीच या माणसाने तिला सोन्याची नाणी मोजताना पाहिलं होतं आणि आता तो तिला ठार करून ती नाणी लुटणार! त्यासाठीच तो डब्यात घुसला होता.
तो तिच्याकडे तसाच एकटक बघत होता, श्‍वास रोखून धरल्यासारखा. अत्यंत अधीरपणे कोणत्याही क्षणी तिच्यावर झडप घालेल असा.

अचानक तो म्हणाला, बाईसाहेब, घाबरू नका. ती काहीच बोलली नाही. बोलूच शकली नाही. तिचं काळीज इतक्‍या जोराने धपापत होतं की त्याचाच आवाज तिला ऐकू येत होता. कानात गुंई असा आवाजसुद्धा येत होता, तो वेगळाच.

तो पुढे म्हणाला, मी कुणी गुन्हेगार नाही. ती गप्पच राहिली. पण नकळत तिच्या मांड्या जवळ आल्याने तिच्या मांडीवरील खजिना नळातून पाण्याची धार पडावी तसा धबाधबा खाली कोसळू लागला.
तो अनोळखी माणूस आश्‍चर्यचकित होऊन सोन्याच्या त्या प्रवाहाकडे बघू लागला. अचानक ती नाणी उचलण्यासाठी खाली वाकला.

तशी ती अत्यंत घाबरली. ताडकन उठून उभी राहिली. त्यासरशी ती सारीच नाणी खाली कोसळली आणि डबाभर पसरली. ती दाराच्या दिशेने, दार उघडून चालत्या गाडीतून बाहेर रुळांवर उडी घेण्यासाठी धावली.

ती आता काय करणार आहे हे त्याला क्षणार्धात लक्षात आलं. तसा तो पुढे धावला. तिला त्याने पकडून धरलं, जबरदस्तीने पकडून तिच्या जागेवर बसवलं आणि तिची मनगटं आवळून धरत तिला म्हणाला, “”माझं ऐका बाईसाहेब, मी कुणी चोर दरोडेखोर नाहीये. त्याचा पुरावा म्हणून मी आता ही खाली पडलेली सारी नाणी गोळा करून तुमच्या ताब्यात देणार आहे. पण मी एक परागंदा झालेला माणूस आहे. मेल्यातच जमा आहे. माझा जीव फार धोक्‍यात आहे. कसंही करून मला हा देश सोडून जायचं आहे. सरहद्द ओलांडायची आहे. यापेक्षा जास्त मी काही तुम्हांला सांगू शकत नाही. आता तासाभरात शेवटचं रशियन स्टेशन येईल.

त्यानंतर वीस मिनिटांनी आपली गाडी रशियाची हद्द ओलांडेल. तोपर्यंत तुम्ही मला मदत करा. नाहीतर माझं काही खरं नाही. मी कुणाचाही खून केलेला नाही, कुणाला लुबाडलेलं नाही हे मी शपथेवर सांगतो. मी कोणताही गुन्हा केलेला नाही, अनैतिक कृत्य केलेलं नाही. पण यापेक्षा जास्त मला सांगता येणार नाही.
मग खाली वाकून त्याने एकूण एक नाणं गोळा केलं. काना कोपऱ्यात वाकून, बाकांखाली शोधून त्याने सगळी नाणी धंडून काढली. तिची नाण्यांची चामडी पिशवी पुन्हा पहिल्यासारखी भरून झाल्यावर ती त्याने तिच्या हवाली केली आणि डब्याच्या दुसऱ्या कोपऱ्यात जाऊन शांतपणे बसून राहिला. दोघांपैकी कुणीच काही हालचाल करत नव्हतं. ती अद्यापही भयभीतच होती. तिचा चेहरा सुद्धा पांढराफटक पडलेला होता. पण आता तिला थोडा थोडा धीर येत होता. तो तर जसा होता तसा ताठ बसला होता. एकटक आपल्या समोर पाहत, एखाद्या प्रेतासारखा पांढरा फटफटीत पडलेला.

दर दोन पाच क्षणांनंतर ती चोरट्या नजरेने त्याच्याकडे पाहून घेत होती. तो सुमारे तिशीचा होता, खूपच देखणा आणि रुबाबदार. त्याने आपले केस वाढवून उलटे वळवून घेतलेले होते.
आगगाडी अंधारातून सुसाट वेगाने धावत होती. कर्कश शिट्या मारत होती. कधी तिचा वेग मंदावे आणि मग पुन्हा जलद होई. पण मग तिच्या शिट्या वाढल्या आणि वेग मंदावत अखेर ती थांबली.

सरदार पत्नी मारीचा सेवक इव्हान्स डब्याच्या दारात आला. तिने एक कटाक्ष तिच्या सहप्रवाशाकडे टाकला आणि मग इव्हान्सला कापऱ्या आवाजात भराभरा सांगू लागली, “”इव्हान्स, आता मला तुझी काही गरज नाही. तू साहेबांकडे परत जा. इथूनच परतीची गाडी धर”. इव्हान्स गोंधळला, बावरला. त्याचे डोळे विस्फारले. त्याने बोलण्याचा प्रयत्न केला, “”पण बाईसाहेब….”

“”नाही. तू माझ्यासोबत येण्याची गरज नाही. मी माझा विचार बदलला आहे. तू इथे रशियातच राहा. हे काही पैसे आहेत ते घे आणि परतीच्या प्रवासासाठी वापर. फक्त जाताना तुझा कोट आणि टोपी इथे काढून ठेव”. गोंधळलेल्या, घाबरलेल्या त्या वृद्ध सेवकाच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. आपल्या मालकिणीच्या लहरीपणाशी परिचित असल्याने त्याने निमूटपणे आपला कोट आणि टोपी काढून ठेवली आणि तो डब्याबाहेर चालता झाला.

गाडी पुन्हा सुरू झाली आणि सरहद्दीच्या दिशेने पुढे निघाली. सरदार पत्नी शेजाऱ्यास म्हणाली, “हे सारं तुमच्यासाठी आहे. महोदय, आता तुम्ही इव्हान्स आहात. माझे सेवक. हे सारं मी फक्त एका अटीवर करत आहे. तुम्ही माझ्याशी एक शब्दही बोलणार नाही. ना आभार मानण्यासाठी ना कशाचसाठी.’ अज्ञात सहप्रवासी फक्‍त नम्रपणे झुकला.

सरहद्दीच्या आधी गाडी पुन्हा थांबली. गणवेशातील अधिकारी डब्यात आले. मारीने त्यांना आपली कागदपत्रे दाखवली. कोपऱ्यात बसलेल्या त्या अनोळखी इसमाकडे बोट दाखवून म्हणाली, “”हा माझा सेवक असून हा त्याचा पासपोर्ट”. अधिकारी बाहेर पडले. गाडी पुढे निघाली. रात्रभर दोघंही परस्परांशी एक शब्दही न बोलता आपापल्या जागी बसून होते.

सकाळी जर्मनीतलं एक स्टेशन आलं. अज्ञात सहप्रवासी उठून उभा झाला. दारात जाऊन वळला आणि तिला म्हणाला, “”बाईसाहेब, मी वचन तोडतोय, मला माफ करा. पण तुम्ही तुमच्या सेवकाला परत पाठवलं आहे. त्यामुळे तुमची गैरसोय होत आहे. तुमची आज्ञा असेल तर त्याची जागा मी घेऊ का?” तिने क्षणभर विचार केला आणि शांतपणे म्हणाली, “”शेजारच्या डब्यातून माझ्या मोलकरणीला बोलावून आणा”. त्याने तसं केलं आणि मग तो अदृश्‍य झाला. पुढच्या एका स्टेशनावर ती भोजनासाठी उतरली तेव्हा तिला जरा दूर अंतरावर तो दिसला. तिच्याचकडे बघणारा. अखेर ते मेंटोनला येऊन पोहोचले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.