#प्रभात_दीपोत्सव_२०२० : हा घे परिजात

बंगाली कथा; मूळ लेखक : रामनाथ राय
अनुवाद : वसुधा सहस्रबुद्धे


चालता चालता ते दोघेजण नदी किनारी जाऊन पोहोचले. किनाऱ्यावर खूप झाडी होती. तिथं खूप वेगवेगळ्या रंगांची फुलं फुलली होती. चिमण्यांचा किलबिलाट सुरू होता. नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर जो डोंगर दिसत होता तिथंही घनदाट जंगल होतं. ते दोघंही एका झाडाखाली बसले. थोड्या वेळानं मुलानं सिगारेट पेटवली. 

त्याला सिगारेट ओढताना बघून मुलगी म्हणाली,
‘सिगारेट नको ओढू. फेकून दे. ही सवय मला आवडत नाही.’
‘का नाही आवडत?’
‘मला सिगारेटचा वास सहन होत नाही.’
मुलगा रागाने सिगारेट दूर फेकून आला. मग म्हणाला, ‘आता खूश आहेस ना ! बघ, मी सिगारेट फेकून दिली.’
मुलगी म्हणाली, ‘हो, आता मी खूश आहे.’
थोड्या वेळाने मुलगा म्हणाला, ‘ही जागा किती निर्जन आहे आणि तितकीच शांत आहे. इथे आल्यावर खूप बरं वाटत आहे!’
मुलगी म्हणाली, ‘या आधी मी इथे कधीच आले नाही. या जागेचं काय नाव?’
मुलगा गमतीत म्हणाला, ‘हे वृंदा आहे.’
‘वृंदा आहे.’ त्याचं बोलणं थांबवून मुलगी म्हणाली,
‘नाही. हे खरं नाही. या जागेचं नाव नंदनकानन आहे.’
‘असू शकतं. या जागेचं जे नाव तू ठेवशील, तीच ही जागा होईल.’
‘ही समोर वाहणारी नदी कोणती आहे?’

मुलाने थोडा विचार करून म्हटलं, ‘ही बहुतेक यमुना नदी असावी. ही नदी अलकनंदासुद्धा असू शकते. तुझ्यासाठी मी या नदीचं नाव अलकनंदा ठेवतो.’
‘का बरं? हेच नाव का?’
‘माझी मर्जी! नावात काय आहे? आठवतंय ज्युलियटने रोमिओला काय म्हटलं होतं?’
‘काय म्हटलं होतं?’

‘गुलाबाच्या फुलाला पाहिजे त्या फुलाचं नाव दे, ते आपला सुगंध देणं थांबवित नाही. तसंच या नदीला कोणत्याही नावाने हाक मारा. या नदीचं नाव तुला पाहिजे ते ठेव. याची सुंदरता कमी होणार नाही.’
हे ऐकून मुलीला हसू आलं. हसता हसता ती म्हणाली, ‘या जागेचं नाव जर नंदनकानन आणि या नदीचं नाव जर अलकनंदा आहे, तर मग समोर दिसणाऱ्या डोंगराचं नाव काय आहे?’
मुलगा म्हणाला, ‘या डोंगराचं नाव हिमाद्री होऊ शकतं किंवा त्रिकुट नाहीतर सुमेरू होऊ शकतं. आता सांग, यापैकी कोणतं नाव तुला अधिक आवडेल?’
‘सुमेरू!’

‘तर मग त्या डोंगराचं नाव तुझ्यासाठी सुमेरू आहे असं समज !’
यानंतर दोघेजण बराच वेळ गप्प बसले होते. त्यांच्यासमोर अलकनंदा नदी वाहत होती. वाऱ्याच्या झोतांमुळे नदीच्या पाण्यावर लहानमोठे तरंग उठत होते. त्या तरंगांवर सूर्यकिरण असे चमकत होते, जणू त्यांनाही या नावाने खूप आनंद झाला आहे. नदीच्या या आनंदात अलकनंदेच्या शरीरावर कुठूनतरी एक सुंदर फूल तरंगत येताना दिसलं. फूल बघून मुलगी म्हणाली, ‘ते पाहा! नदीतून किती सुंदर फूल तरंगत येते आहे.’

मुलगा म्हणाला, ‘होय, ते फूल खरंच खूप सुंदर आहे.’
‘ते कोणतं फूल आहे.’
‘या जागेचं नाव जर नंदनकानन होऊ शकतं, या नदीचं नाव अलकनंदा होऊ शकतं आणि समोरचा डोंगर सुमेरू होऊ शकतो तर हे फूल पारिजात असेल.’
मुलगी म्हणाली, ‘तर मग ते पारिजाताचं फूल मला हवं.’
‘ते फूल घेऊन तू काय करणार?’
‘मी माझ्या अंबाड्यावर माळीन.’
‘परंतु त्या झाडाचं रोप कोठे मिळणार? मला तर माहिती नाही!’
‘कुठूनही शोधून आणा. मला ते फूल पाहिजे.’
‘कोठे शोधणार? कसा शोधणार?’
‘ते मला माहिती नाही. मला ते फूल हवं! तुम्ही जर ते फूल माझ्यासाठी आणलं नाही तर मी समजेन…’
‘काय समजशील?’
‘की तुमचं माझ्यावर प्रेम नाही.’
‘यात प्रेम करणं आणि न करणं कुठून आलं?’
मुलगा दुःखी झाला.
‘तुझा माझ्यावर अजूनही विश्‍वास नाही?’

मुलगी म्हणाली, ‘माझा तुमच्यावर विश्‍वास आहे, परंतु मला ते फूल हवं.’
मुलीच्या हट्टापुढे मुलगा गप्प बसला. मग विचार करू लागला. ते फूल मिळविण्यासाठी काय करता येईल. तेवढ्यात त्याला एक नावाडी येताना दिसला. होडी घेऊन तो त्याच्या बाजूलाच येत होता. मुलाने नावाड्याला किनाऱ्याकडे बोलावलं. ‘ओ दादा, जरा इकडे या ना!’
नावाड्याने तिथूनच विचारलं, ‘सांगा, काय म्हणताय? कशाला बोलावताय?’
‘जरा इकडे या ना !’

‘कशाला?’
‘तुमच्याशी थोडं बोलायचं आहे !’
नावाड्याने होडी किनाऱ्याला लावली. मुलगा त्याच्याजवळ जाऊन म्हणाला, ‘तू इथलाच आहेस का? इथेच राहतोस?’
‘हो.’
‘नाव काय आहे तुझं?’
‘कृष्ण.’
‘कृष्ण पुढे काय?’
‘बस्‌-कृष्ण. एवढंच नाव आहे माझं.’
‘मला तुझ्याकडून थोडी माहिती हवी आहे.’
‘कसली माहिती हवी आहे?’

‘थोड्या वेळापूर्वी एक सुंदर फूल या नदीतून तरंगत गेलं. त्या फुलाचे नाव पारिजात आहे का?’
‘होय, त्या फुलाचं नाव पारिजात आहे.’
‘ते फूल मला कुठे मिळू शकेल?’
‘त्या समोरच्या डोंगरावर.’
‘मला त्या डोंगरावर घेऊन जाशील?’
‘नाही.’
‘का नाही?’

‘त्या डोंगरावर कोणी माणूस जाऊ शकत नाही. तिथे घनदाट जंगल आहे.’
‘तर मग ते फूल मला कसं मिळेल? ते पारिजातचं फूल मला हवं होतं.’
‘तुम्ही काळजी करू नका. एक दिवस मी स्वतः तुम्हाला फूल आणून देईन.’
‘परंतु केव्हा?’
नावाडी प्रश्‍नाचं उत्तर न देताच निघून गेला.
मुलगा त्याच्याकडे बघत मनातल्या मनात म्हणाला, ‘विचित्र माणूस आहे.’ मग तो मुलगा पुन्हा मुलीजवळ येऊन बसला आणि म्हणाला, ‘मी त्या नावाड्याशी बोललो आहे. तू ऐकलंस ना?’
मुलगी म्हणाली, ‘होय, मी सगळं काही ऐकलं आहे.’

मुलगा म्हणाला, ‘मी हरलो नाहीये. मी प्रयत्न चालू ठेवणार. एक दिवस मी इथे पुन्हा येईन. तू येशील माझ्याबरोबर?’
मुलगी म्हणाली, ‘हो. मी येईन तुमच्याबरोबर.’
त्यानंतर एक वर्ष उलटलं. मधल्या काळात त्यांनी लग्न केलं. त्यांना एक मुलगा झाला. आता ते तिघे जण राहतात. वडील रोज ऑफिसात जातात. आई घर सांभाळते. रोज संध्याकाळी मुलाला अभ्यासाला बसवते. आता मुलगा दहा वर्षांचा झाला. एक दिवस संध्याकाळी मुलगा अभ्यास करीत होता. परंतु त्याचं मन आज अभ्यासात रमत नव्हतं.

आई म्हणाली, ‘आज तुला काय झालं? आज मन लावून अभ्यास का करीत नाही?’
मुलगा म्हणाला, ‘आज मला अभ्यास करावा असं वाटत नाही.’
आई मला गोष्ट सांग ना. गोष्ट ऐकावीशी वाटते!’
आई म्हणाली, ‘मला गोष्ट येत नाही. पण एका जागेबद्दल माहिती आहे.’
उत्सुकतेने मुलगा म्हणाला, ‘कोणत्या जागेची माहिती आहे? अमेरिकेबद्दल?’
‘नाही.’
‘मग?’
‘ती एक खूप सुंदर आणि अद्‌भुत जागा आहे.’
‘कुठे आहे.’
‘आपल्या भारतात.’
‘तू तिथे गेली आहेस का?’
‘होय. आम्ही तेथे गेलो होतो.’
‘आम्ही म्हणजे?’
‘मी तुझ्या वडिलांबरोबर तिथे गेले होते.’
‘तिथे काय आहे?’

‘चारही बाजूंनी लहान मोठे वृक्ष आहेत. ज्यावर सुंदर सुंदर फुलं उमलतात. तिथे एक नदी वाहते. तिचं नाव अलकनंदा. तिथे अनेक प्रकारचे पक्षी किलबिलत असतात. त्या जंगलाचं नाव आहे नंदनकानन. नदी पलीकडे एक डोंगर आहे. त्याचं नाव आहे सुमेरू. मी आणि तुझे पप्पा त्या नदीकिनारी खूप वेळ बसलो होतो. अचानक नदीमध्ये तरंगत येणारं फूल आम्हाला दिसलं. ते फूल खूप सुंदर होतं. कोणीही त्या पारिजात फुलाला बघितलं असतं तर तो मुग्ध झाला असता. मला ते फूल मिळावं असं वाटत होतं.

परंतु ते फूल कुठे मिळतं ते आम्हाला माहिती नव्हतं. त्यावेळी एक नावाडी होडी घेऊन तिकडे आला. त्याचं नाव होतं कृष्ण. त्यानेच आम्हाला सांगितलं की त्या पलीकडच्या डोंगरावर पारिजात फूल आहे. तुझे वडील त्या डोंगरावर जायला तयार झाले. परंतु कृष्ण नावाड्याने तुझ्या पप्पांना वचन दिलं की योग्य वेळी तो तुम्हाला पारिजातचे फूल आणून देईल. परंतु तो केव्हा आणणार? हे न सांगता निघून गेला. तिथे पुन्हा एकदा जाण्याची आमची इच्छा आहे.’

ऐकल्यावर मुलगा म्हणाला, ‘आई, मीसुद्धा तिथे जाईन.’
‘आत्ता तू तिथे जाऊ शकत नाही. आधी अभ्यास करून मोठा हो. मग तिकडे जा.’
‘मी मोठा झाल्यावर मला तिकडे घेऊन जाशील?’
‘हो. नेईन.’
एवढ्यात डोअरबेल वाजली. आईने जाऊन दरवाजा उघडला. वडील घरात आले. त्यांना बघताच मुलगा म्हणाला, ‘पप्पा, तुम्ही एका सुंदर जागेवर फिरायला गेला होता का? ती जागा अद्‌भुत आहे? हे खरं आहे का पप्पा?’
हसत हसत वडील म्हणाले, ‘होय, हे खरं आहे.’
‘त्या जागेचं नाव नंदनकानन आहे?’
‘होय.’
‘त्या नदीचं नाव अलकनंदा?’
‘होय.’
‘आणि त्या नदीजवळ सुमेरू डोंगर आहे?’
‘होय.’
‘त्या डोंगरावर काय आहे?’
‘तिथे पारिजात फूल उमलतं.’
‘आणखी काय आहे?’
‘मला माहिती नाही.’
‘मलाही तिकडे जायचं आहे.’
‘आधी मोठा तर हो, मग जा.’
‘मी कधी होणार मोठा?’

हसतच वडील म्हणाले, ‘होणार, एक दिवस खूप मोठा होणार तू!’
मग आई म्हणाली, ‘किती वर्षे झाली. आपलं वय व्हायला लागलं. परंतु कृष्ण नावाडी अजूनही ते पारिजात फूल घेऊन आला नाही. कधी येईल कोणास ठाऊक?’
‘आपल्याला तिकडे एकदा जायला पाहिजे.’ ‘परंतु आपली तिथे कृष्ण नावाड्याशी ओळख होईल का?’ ‘नक्‍की होईल. मनात विश्‍वास असायला हवा.’

बघता बघता मुलगा मोठा झाला. नोकरी मिळाल्यावर तो बंगलोरला गेला. तिथे त्याने आपल्या पसंतीच्या मुलीशी लग्न केलं. लग्नानंतर काही दिवसांतच तो आपल्या पत्नीला घेऊन अमेरिकेला गेला. अमेरिकेला गेल्यावरही तो आपल्या आई-वडिलांना विसरला नाही. नेहमी फोन करून त्यांची विचारपूस करायचा.
एक दिवस संध्याकाळी मुलाचा फोन आला. बोलता बोलता आई मुलाला सांगू लागली,
‘एक दिवस तुला मी नंदनकाननबद्दल सांगितलं होतं. आठवतंय काय तुला?’
मुलगा म्हणाला, ‘हो, आठवतंय ना !’
‘तुला तिकडे जावंसं वाटत नाही?’
‘नाही.’
‘का?’
‘ती सगळी तुम्हा लोकांची कथा आहे.’
‘नाही रे, ती कथा नाही. खरी गोष्ट आहे. आम्ही पुन्हा एकदा एक दिवस तिकडे जाऊ. तू आमच्याबरोबर तिकडे नाही येणार?’
‘आई, जाऊ दे ना त्या सगळ्या गोष्टी. तुम्ही इथे माझ्याकडे या. तुम्ही इकडे अमेरिकेला आलात ना, मग तुमचं नंदनकानन छू मंतर होऊन जाईल.’
‘असं नाही बोलायचं बाळा!’
‘ठीक आहे, मग तुमचं नंदनकानन घेऊन तुम्ही तिथेच राहा. मला नाही ठाऊक!’
‘होय. आम्ही त्यासाठीच इथे राहणार आहोत.’
मुलगा प्रेमळ आवाजात म्हणाला, ‘आई रागावलीस?’
‘नाही बाळा! मी रागावले नाही. मी देवाजवळ प्रार्थना करते की तुम्ही जिथे आहात तिथे सुखात राहा. तुमची जागा नंदनकानन बनू दे.’ एवढं बोलून आईने फोन कट केला.

आईला आपल्या मुलाचा अभिमान वाटतो. मुलाचा आई-वडिलांच्या नंदनकाननवर विश्‍वास नाहीये, परंतु बालपणी एक दिवस त्याने नंदनकाननवर विश्‍वास ठेवला होता. आज त्याला काय झालं? त्यानं खूप शिक्षण घेतलं आहे. त्यामुळेच त्याच्या मनात अविश्‍वास निर्माण झाला आहे. इतक्‍या अविश्‍वासाबरोबर तो कसा जाणार? असा विचार करताना आईने मनातल्या मनात देवाला प्रार्थना केली, ‘हे ईश्‍वरा, माझ्या मुलाला सद्‌बुद्धी दे!’

त्याचवेळी दरवाजाची बेल वाजली. वडील ऑफिसमधून घरी आले. आत येताच ते म्हणाले, ‘आता फक्‍त एक महिना राहिला आहे.’
आईला काही समजलं नाही. तिने विचारलं, ‘एक महिना कशासाठी राहिला आहे?’
‘मला नोकरीतून रिटायर्ड व्हायला एक महिना राहिला आहे. त्यानंतर सुटीच सुटी. आता आणखी नोकरी करायचा मला कंटाळा आला.’
आई खूश होऊन म्हणाली, ‘चांगलंच आहे. मग आपण नंदनकाननला जाऊ शकतो.’
वडील म्हणाले, ‘बरोबर आहे. आपण पुन्हा नंदनकाननला जाऊ शकतो. ती एखाद्या स्वप्नासारखी सुंदर जागा आहे. परंतु जायच्या आधी…’

काळजी करीत आई म्हणाली, ‘परंतु जायच्या आधी काय?’
‘सगळ्या गोष्टींची योग्य व्यवस्था करायला हवी.’
‘सगळ्या गोष्टी म्हणजे काय?’
‘मी पैशाअडक्‍याबद्दल बोलतो आहे.’
‘जे काय करायचं ते करा. परंतु जायला उशीर करू नका.’
एक महिन्याने वडील नोकरीतून रिटायर्ड झाले. ग्रॅच्युईएटीचे आणि प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे मिळाले. शिवाय दर महिन्याला पेन्शन मिळेलच. त्यामुळे आयुष्य संपेपर्यंत पैशांची चणचण जाणवणार नाही. परंतु एवढे सगळे पैसे ठेवायचे कसे याची चिंता होती. कोणी पैसे बॅंकेत ठेवायचा सल्ला देत होते. तर काहींचं म्हणणं होतं सगळी रक्‍कम बॅंकेत ठेवणं सुरक्षित नाही. त्यापैकी काही रक्‍कम पोस्टात ठेवणं योग्य होतं. कोणी कोणी शेअर मार्केटमध्ये गुंतवण्याचा सल्ला देत होता. वडिलांनी यापूर्वी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले होते. परंतु आता त्यांना ते आवडत नाही. म्हणून खूप विचार करून त्यांनी पैसे पोस्टात ठेवले आणि बाकी उरलेले बॅंकेत ठेवले. काही रक्‍कम बचत खात्यात तशीच ठेवणं त्यांना योग्य वाटलं. काही रकमेचं फिक्‍स डिपॉझिट केलं.

आई म्हणाली, ‘बॅंकेत जास्त रक्‍कम ठेवू नका.’
वडील म्हणाले, ‘का?’
‘इन्कमटॅक्‍सच्या लोकांचं बरोबर लक्ष असतं. कधी धरपकड करतील सांगता येणार नाही.’
‘त्यासाठी घाबरायचं काही कारण नाही. मी नेहमी इन्कमटॅक्‍स भरतो. मी त्यात कधीच लबाडी केली नाही. सरकारला जे पाहिजे ते मी देईन. त्याचबरोबर तुला जे मिळण्याचा अधिकार आहे ते मी तुला देईन. माझ्या मृत्यूनंतर तुला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची पूर्ण व्यवस्था मी केली आहे.’
‘आतापासून मरणाच्या गोष्टी का करीत आहात?’
‘एक दिवस मरावं तर लागेलच.’

‘आता तर मरत नाही ना? मग असं का बोलता?’ ‘मृत्यूबद्दल काही सांगू शकत नाही. मी आज मरू शकतो, नाहीतर दहा वर्षांनंतर मरू शकतो.’ ‘तुमच्या आधी मला मरायचं आहे. सध्या मला बरं वाटत नाही.’
‘सध्या माझी तब्येतही बरी नाही.’
काळजीने बेचैन होऊन आई म्हणाली, ‘काय होतंय तुम्हाला?’
उदास होऊन पिता म्हणाले, ‘हल्ली मधूनमधून माझं डोकं खूप दुखतं. काही समजत नाही. कशामुळे ते दुखतं.’
हे ऐकून आईला दुःख झाले. चिंतीत होऊन ती म्हणाली, ‘तर मग उद्याच एखाद्या चांगल्या डॉक्‍टरना दाखवायला हवं.’

‘होय. डॉक्‍टरना दाखवीनच, परंतु त्याआधी नंदनकाननला जाणं खूप आवश्‍यक आहे. आज सुद्धा माझ्या डोळ्यासमोर कितीतरी वेळा ते जंगल, झाडी, तो डोंगर तरळत राहतात. ती नदी माझ्या डोळ्यासमोर वाहताना दिसू लागते. कृष्ण नावाड्याची आठवण येऊ लागते. अजून त्याने आपल्याला पारिजातचं फूल आणून दिले नाही. फूल देण्याचे त्याने वचन दिले होते. असं वाटतं तो आपला वादा विसरला. आता माझं वय वाढू लागलं आहे. शेवटी कधी मिळणार पारिजात फूल? जर नाही मिळालं तर तुला ते फूल मी देऊ शकलो नाही याचं दुःख आयुष्यात राहून जाईल.’

आई म्हणाली, ‘आता मला पारिजात फुलाची काही आवश्‍यकता नाही.’
पिता म्हणाले, ‘आवश्‍यकता का नाही?’
‘आता माझे केस अंबाडा बांधण्यासारखे राहिले नाही.’
‘नसतील तर काय झालं? मी ते पारिजात फूल तुला आणून देणार. ते माझं स्वप्न आहे.’
‘तर मग चला, आपण तिकडे जाऊ या!’

‘परंतु नंदनकानन अजूनपर्यंत राहिलं असेल का? जर असेल तर अलकनंदा नदी अजूनही वाहत असेल का? कृष्ण नावाडी आपली होडी घेऊन जात असेल का? जर कृष्ण नावाडी जात असेल तर सुमेरू डोंगरावर अजूनही ते पारिजात फूल फुलत असेल का? मला ठाऊक नाही. हे सगळं माझ्यासमोर स्वप्नासारखं आहे.’
‘जर असं असेल तर मग तिकडे जाण्याची काहीच आवश्‍यकता नाही. जितके दिवस आपण जिवंत असू इथेच आपलं आयुष्य सुखासमाधानात राहू.’
‘परंतु मी नंदनकानन विसरू शकत नाही. कसं का होईना, एकदा तरी आपल्याला तिथे जायलाच हवं.’
आई काहीच बोलली नाही. गप्प बसली. जायचं ठरवूनही कुठे जाता येत नाही. हळूहळू दोघे म्हातारे होऊ लागले. एक दिवस म्हातारी रागाने म्हणाली, ‘आता केव्हा जाणार नंदनकाननला? आता तर आपण फारच अशक्‍त झालो आहोत.’

म्हातारा म्हणाला, ‘आता आपण नक्‍की जाऊ या. चला उद्याच निघू या. तू चालू शकशील?’
म्हातारी म्हणाली, ‘हो. मी चालू शकते.’
आता दोघांमध्ये पहिल्यासारखी गती राहिली नाही. आपल्या अशक्‍त शरीरासह खूप कष्ट करून ते नंदनकाननला पोहोचले. परंतु हे काय! इथे झाडं, वृक्ष, जंगल काही नाही. कोणी कापले असतील कोणास ठाऊक. ती नदीसुद्धा वाहत नाही. नदीचं पाणी जवळजवळ सुकलं आहे. नदीमध्ये कुठेही पारिजात तरंगत जाऊ शकत नाही. त्या बाजूच्या डोंगरावर ते सौंदर्यही दिसत नाही. डोंगराच्या चारी बाजूंनी लोकांची ये-जा चालू आहे. असं वाटतं आहे दूर कुठेतरी एक मोठा कारखाना सुरू झाला आहे. तो कारखाना कसा आहे? त्याचवेळी एक माणूस समोरून येताना दिसला. म्हाताऱ्याने त्याला थांबवून विचारलं, ‘मला तुमच्याकडून थोडी माहिती हवी होती.’

त्या माणसाने विचारलं, ‘कोणती माहिती पाहिजे होती?’
‘तुम्ही त्या कारखान्यात काम करता का?’
‘हो, मी त्या कारखान्यात काम करतो.’
‘आम्ही दोघं खूप वर्षांपूर्वी इथे फिरायला आलो होतो. त्यावेळी इथे चारही बाजूंनी हिरवळच हिरवळ होती. ही नदी किती सुंदर दिसत होती. हा डोंगरही खूप छान दिसत होता. ती सगळी हिरवळ, वृक्ष, जंगल, ती नदी… तो डोंगर… हे असं कसं झालं?’

तो माणूस हसला आणि म्हणाला, ‘तिथे लोखंडाचा एक मोठा कारखाना बनणार आहे. म्हणून ही जागा कापून सारखी केली आहे. या नदीवर एक मोठा पूल बनणार आहे. त्या डोंगरावर लोकांना राहायला घरं आणि मोठं हॉटेल बनणार आहे. म्हणून डोंगर डायनामाइट लावून तोडला आहे. म्हणजे सुंदर रस्ता बनविता येईल.’
‘हे सगळं कोण बनवित आहे?’
‘कोणती तरी प्रसिद्ध परदेशी कंपनी आहे. मला नाव माहिती नाही.’
‘ओह!’ असं म्हणत म्हातारा तिथेच जमिनीवर बसला. म्हातारीसुद्धा त्याच्या बाजूला येऊन बसली. माणूस गेल्यावर ती म्हणाली, ‘अचानक इथे लोखंडाचा कारखाना का बनतो आहे?’
म्हातारा म्हणाला, ‘इथे जमिनीखाली भरपूर लोखंड आहे असं वाटतं.’
‘म्हणून हे सगळं नाटक चाललं आहे.’

‘होय, त्यासाठीच हे सगळं चाललं आहे.’
‘इथे येऊन मन खूप उदास झालं. नसतो आलो तर बरं झालं असतं.’
‘मलाही तसंच वाटतंय!’ काही वेळ गप्प बसल्यावर म्हातारा म्हणाला,
‘परंतु मी वेगळाच विचार करतो आहे.’
‘काय विचार करता आहात?’

‘कृष्ण नावाड्याने सांगितले होते की एक दिवस तो पारिजात फूल आणून देईल. ते फूल कसं मिळणार?’
म्हातारी म्हणाली, ‘आता मला पारिजात फुलाची अजिबात इच्छा नाही. चला घरी जाऊ या.’
‘परंतु मी तुला वचन दिलं होतं त्याचं काय?’
म्हातारी हे ऐकून गप्प बसली. म्हाताराही गप्प बसला. थोड्या वेळाने दोघेही तिथून जाण्यासाठी उठून उभे राहिले. शेवटचं एकदा बघावं म्हणून म्हाताऱ्याने चारही बाजूला पाहिलं. ते पाहून म्हातारीच्या डोळ्यात अश्रू आले.

घरी आल्यावर दोघेही झोपले. पलंगाजवळ एक लहानसं टेबल आहे. त्यावर टेलिफोन ठेवला आहे. म्हातारी म्हणाली, ‘मुलाला एकदा फोन करा.’
म्हातारा म्हणाला, ‘नाही, आता मला कशाचीच आवश्‍यकता नाही. मला फक्‍त एक माणसाची आवश्‍यकता आहे.’
‘कोणता माणूस?’
‘कृष्ण नावाडी.’
‘आता तो तुम्हाला कोठे भेटणार?’

‘इथेच भेटेल. माझा पूर्ण विश्‍वास आहे. तो कधीही खोटं बोलणार नाही. परंतु तो कधी येईल? आता सहन होत नाही. मी आता हळूहळू समाप्त होतो आहे.’
‘तुमचा एवढा विश्‍वास आहे ना. मग तो एक दिवस नक्‍कीच तुमच्याकडे येईल. परंतु आत्ता तर झोपा.’
दोन दिवसांनंतर अचानक म्हाताऱ्याच्या डोक्‍यात भयंकर वेदना होऊ लागल्या.
म्हातारी म्हणाली, ‘डॉक्‍टरांना बोलावू?’
‘नको, त्याची आवश्‍यकता नाही.’
‘आवश्‍यकता का नाही?’

‘मला तुझ्यासमोर असंच मरायचं आहे. माझ्यासाठी धावपळ करून माझा त्रास आणखी वाढेल. मला आता काहीच चांगलं वाटत नाही.’ एवढं बोलल्यावर म्हातारा माणूस सगळं काही विसरू लागला. जणू तो अशा एखाद्या नशेमध्ये गुंग झाला जिथे त्याला दिसू लागलं- अलकनंदेवरील तो कृष्ण नावाडी हसत हसत त्याच्यासमोर येऊन उभा राहिला आहे. त्याच्या हातात पारिजात फूल आहे.

कृष्ण नावाडी पारिजात फूल म्हाताऱ्यासमोर धरून म्हणतो, ‘हे घ्या तुमचं पारिजात फूल. तुम्ही हे फूल माझ्याकडे मागितलं होतं ना. हे पाहा, मी घेऊन आलो आहे.’

म्हातारा माणूस ते फूल खूप कष्टाने आपल्या म्हाताऱ्या पत्नीच्या हाती देतो आणि म्हणतो, ‘हे घे तुझं पारिजात फूल. आता तू हे तुझ्या आंबाड्यावर माळ. तू सुंदर दिसशील.’

परंतु म्हाताऱ्या माणसाच्या गळ्यातून स्वर उमटला नाही. त्याचे दोन्ही ओठ किती वेळा थरथरले आणि शांत झाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.