प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 18 – पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज दूध) संकलित दुधासह दुग्धजन्य उपपदार्थांना ग्राहकांची मोठी मागणी आहे. त्यामुळे उत्पादन क्षमतेत वाढ करण्यासाठी राष्ट्रीय दुग्धविकास महामंडळाच्या (एनडीडीबी) आर्थिक सहयोगाने अत्याधुनिक यंत्रणा खरेदी करून विस्तारीत प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
येत्या डिसेंबरपर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित होईल, अशी माहिती दूध संघाच्या अध्यक्षा केशरताई पवार यांनी दिली. या प्रकल्पामुळे दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन तिपटीने वाढणार आहे. कात्रज दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या मंगळवारी (दि.20 ) मुख्यालयात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. या वेळी संघाचे उपाध्यक्ष राहुल दिवेकर, संचालक गोपाळराव म्हस्के, भगवान पासलकर, भाऊ देवाडे, लता गोपाळे आणि प्रभारी व्यवस्थापकीय संचालक संजय कालेकर उपस्थित होते.
“एनडीडीबी’च्या सहकार्याने 8 कोटींची मशिनरीमध्ये क्रीम सेपरेटर, पाश्चरायझर, श्रीखंड – आम्रखंड पॅकिंग मशिन, दही-ताक लस्सी पॅकिंग मशिन, पनीर-मिठाई पॅकिंग मशिनचा समावेश आहे. गतवर्षात कात्रजच्या दुग्धजन्य पदार्थांची विक्री सुमारे 64 कोटी 58 लाख
रुपयांइतकी झाली आहे. दूध उत्पादकांना सन 2020-21 च्या दूध दर फरकापोटी 7 कोटी 90 लाख रुपये देण्यात आल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.
ससून, येरवडा जेलला दूध पुरवणार
आगामी काळात कात्रज दूध संघाकडून नव्याने एकूण 167 आधुनिक मिल्क व आईस्क्रीम पार्लर सुरू करण्यात येणार आहे. तसेच एनडीए, येरवडा जेल, ससून रुग्णालयाला दूध व दुग्धजन्य पदार्थांचा पुरवठा करण्यात येत आहे. पेण, पनवेल, नवी मुंबई, वसई तसेच सिन्नर, नाशिक या ठिकाणी मिल्क पार्लर सुरू केलेली आहेत. तसेच पुणे -सोलापूर-अक्कलकोट आणि पुणे-सातारा-महाबळेश्वर या दोन मार्गांवर दूधवितरण सुरू करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले.