पिंपरी, दि. 18 -पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांवर दरवर्षी कोट्यवधींचा खर्च करण्यात येतो. आता बोधचिन्ह, घोषवाक्य, नाव आणि एकसारखे दिशादर्शक चिन्हे लावण्यासाठी कोट्यवधींचा खर्च केला जाणार आहे. याला आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी नुकतीच स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता दिली.
पिंपरी महापालिकेच्या शहरात 18 माध्यमिक, 110 प्राथमिक शाळा आणि 207 बालवाड्या आहेत. यामध्ये सुमारे 50 हजारपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महापालिकेच्या शाळांत विद्यार्थ्यांना गणवेश, पीटी गणवेश, शूज, रेनकोट, स्वेटर, दप्तर, पुस्तके आणि वह्या असे साहित्य दरवर्षी मोफत दिले जाते. तसेच स्वच्छता, रंगरंगोटी, दुरुस्ती काम, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे वेतन आदींवर खर्च होतो. बोधचिन्ह, घोषवाक्य, नाव आणि एकसारखे दिशादर्शक चिन्हाचे फलक लावले जाणार आहेत. त्यावर कोट्यवधींचा खर्च केला जाणार आहे. महापालिकेच्या शाळा या मराठी माध्यमाच्या आहेत. सर्व शाळा इमारतींवर पिंपरी-चिंचवड महापालिका शाळा असे नामफलक आहेत. आता त्या शाळेवर पीसीएमसी पब्लिक स्कूल असे एकसारखे नव्याने फलक लावण्यात येणार आहेत.