मुंढवा – येथील महात्मा फुले चौकातील मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. त्यांचा अंदाज न आल्याने अपघात वाढले होते. त्यावर “मुंढव्यातील खड्डे बुजविणार कोण?’ अशा आशयाची बातमी “प्रभात’ने नुकतीच प्रसिद्ध केली होती. त्याची दखल घेत नगरसेविका पूजा कोद्रे यांनी पथ विभागास सूचना दिल्या. त्यावर हे खड्डे बुजविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांनी “प्रभात’चे आभार मानले.
मुंढवा येथील मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. यामध्ये पाणीही साठत होते. याचा त्रास वाहनचालकांना होत होता. त्यावर अखेर महापालिकेने डागडुजी सुरू केली. दरम्यान, “हे खड्डे तात्पुरती मलमपट्टी करून बुजवायला नको. यावर कायमस्वरूपी इलाज केला, तर भविष्यात येथे खड्डे पडणार नाहीत. येथील सर्वच मुख्य रस्ते हे सुस्थितीत नव्याने डांबरीकरण करावे. शिवाय अंतर्गत रस्त्यांचाही प्रश्न आहे. तोसुद्धा महानगरपालिकेने सोडविला पाहिजे,’ अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.