उर्मिला मातोंडकरचे गोपनीय पत्र फुटले

निरूपम यांच्या सहकाऱ्यांवर केली होती टीका

मुंबई – कॉंग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिचे एक गोपनीय पत्र फुटल्याचे उघड झाले आहे. पत्रातील मजकूर उघड होण्याची बाब दुर्दैवी असल्याची खंत तिने व्यक्त केली आहे. त्या पत्रात उर्मिलाने मुंबई कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम यांच्या दोन सहकाऱ्यांवर टीका केली होती.

उत्तर मुंबई मतदारसंघातून उर्मिलाने लोकसभेची निवडणूक लढवली. मात्र, भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी तिचा तब्बल 4 लाख 65 हजार 247 इतक्‍या मताधिक्‍याने पराभव केला. त्या निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याच्या आठवडाभर आधी उर्मिलाने मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांना गोपनीय पत्र पाठवले. त्यात संदेश कोंडविलकर आणि भूषण पाटील या निरूपम यांच्या निकटवर्तीयांविषयीची नाराजी तिने उघड केली. त्या दोघांवर उर्मिला हिच्या प्रचार मोहिमेच्या समन्वयाची जबाबदारी होती. मात्र, त्या जबाबदारीत ते कमी पडल्याच्या आशयाची टीका उर्मिलाने पत्रात केली. मुंबई कॉंग्रेसच्या नेतृत्वाला स्थानिक पातळीवर समन्वय राखण्यात आलेले अपयश, कार्यकर्त्यांच्या योग्य वापराचा अभाव याकडेही तिने लक्ष वेधले.

आता ते पत्र फुटल्याबद्दल उर्मिलाने एक निवेदन जारी करून खंत व्यक्त केली आहे. कुठल्या वैयक्तिक अजेंड्यापोटी नव्हे; तर देशाची सेवा करण्यासाठी मी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबई कॉंग्रेस अध्यक्षांना मी पक्षहित समोर ठेऊनच पत्र पाठवले. निवडणूक निकाल आणि एक्‍झिट पोल्सचे अंदाज जाहीर होण्यापूर्वीच मी ते पत्र लिहिले. अर्थात, प्रत्येक राजकीय पक्षात काही मुद्‌द्‌यांवर तोडगा काढावा लागतो, असे तिने त्या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, उर्मिलाचे पत्र फुटल्याचा ठपका निरूपम यांनी देवरा यांच्यावर ठेवला आहे. त्यातूून मुंबई कॉंग्रेसमधील धुसफूस कायम असल्याच्या बाबीवर एकप्रकारे शिक्कामोर्तब झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.