थापलिंग यात्रेस प्रारंभ : नवसाचे बैलगाडे धावले
पारगाव शिंगवे/मंचर : पौष पौर्णिमेनिमित्त सदानंदाचा यळकोटचा गजर आणि भंडारा खोबर्याची उधळण करित लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नागापूर (ता. आंबेगाव) येथील श्रीक्षेत्र थापलिंग खंडोबा देवाच्या यात्रेला गुरुवारी (दि. 25 ) उत्साहात प्रारंभ झाला. यात्रेच्या पहिल्या दिवशी सुमारे एक लाख भाविकांनी खंडोबा देवाचे दर्शन घेतले. या यात्रेपासून जिल्ह्यातील गावोगावांच्या ग्रामदेवतेच्या यात्रेला सुरुवात होते. यात्रेच्या पहिल्या दिवशी घाटातून नवसाचे बैलगाडे धावले.
यंदा गुरुवार (दि. 25) व शुक्रवार (दि. 26) असे दोन दिवस यात्रा आहे. यात्रेच्या पहिल्या दिवशी पहाटे देवाची विधीवत पूजा करण्यात आली. त्यानंतर गडावर भाविकांनी जागरण गोंधळ करून आपल्या कुलदैवताचा कुलाचार पूर्ण करून घेतला. दुपारी गडावर भाविक येण्यास सुरुवात झाली. दुपारी 12 वाजता वळती, रांजणी येथील खुडे बंधूंच्या काठी पालख्यांचे गडावर वाजत गाजत आगमन झाले. गडावर जिलेबी भजी, शेव, रेवडीची हॉटेल, रसवंती गृहे, खेळण्यांची दुकाने मोठ्या प्रमाणावर थाटली असून शेतकर्यांनी शेतीसाठी लागणारी अवजारे खरेदी केली. एका दिवसात अंदाजे एक कोटी रुपयांची उलाढाल झाली.
यात्रेनिमित्त पारगावचे सहायक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख पोलिसबंदोबस्त ठेवला होता. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष देवदत्त निकम व उपाध्यक्ष गणेश म्हस्के, सरपंच गणेश यादव उपसरपंच सुनील शिंदे, सोसायटीचे अध्यक्ष दौलत भोर, दगडू पवार व सर्व संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी यात्रेची व्यवस्था पाहिली. आरोग्य विभागाने आरोग्याच्या सुविधा पुरवल्या होत्या.
चौकट : चाकरमानी कुटुंबासह गावात
मुंबई, पुणे व अन्य शहरात नोकरी आणि व्यावसायिका निमित्ताने बाहेर असलेले चाकरमानी आपल्या कुटुंबासह व मित्रमंडळीसह यात्रेला हजेरी लावून यात्रेचा आनंद लुटला. तर जिल्ह्यात थापलिंग खंडोबा देवाचा बैलगाडा शर्यतीचा घाट प्रसिद्ध आहे या घाटातून नवसपूर्तीचे बैलगाडे पळवण्यात आले.