विजय शिंदे
वडापुरी – पुणे जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी गट व गण रचना 10 फेब्रुवारी रोजी सादर करण्यात येणार आहे. गट-गण रचना होण्यापूर्वीच इंदापूर तालुक्यातील इच्छुक उमेदवारांची धडधड वाढली असून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक व विद्यमान पदाधिकारी गट व गणांची रचना होण्याची वाट पाहू लागली आहेत.
इंदापूर तालुक्यात एकूण 2 गट 4 गणांची वाढ झाली असून पंचायत समितीसाठी 18 तर जिल्हा परिषद यासाठी 9 जागा उपलब्ध असणार आहेत. आपल्याला संधी मिळावी यासाठी कार्यकर्ते पक्षनेतृत्वाच्या संपर्कात तसेच गावपातळीवरील अनेक कार्यक्रमात सक्रीय असल्याचे
दिसून येत आहेत. इंदापूर तालुक्यात गट-गण रचना संदर्भात कोणते गाव कोणत्या गणात व गटात येणार ? अशा अनेक चर्चांना ऊत आला असून कोणत्या विद्यमान पदाधिकाऱ्यांचा पत्ता कट होणार व कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसची डोकेदुखी वाढणार?
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचा कस लागणार आहे. हर्षवर्धन पाटील गटाच्या ताब्यात असणाऱ्या इंदापूर पंचायत समिती वर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यासाठी राज्यमंत्री भरणे प्रयत्न करणार आहेत;
परंतु चर्चेत असलेले पक्ष प्रवेश व पक्षातील जुनी निष्ठावंत यांचा ताळमेळ घालून उमेदवार ठरवताना राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढणार असल्याचे दिसून येत आहे.राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व राष्ट्रवादीचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर उमेदवारीसाठी पक्षांतर्गत बंडाळी थंड करण्यात किती यशस्वी होणार याकडे लक्ष असणार आहे.
युवकांना संधी देण्याची मागणी
इंदापूर तालुक्यातील राजकारणात युवकांची संख्या लक्षणीय असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपमधून युवकांना उमेदवारीची मागणी वाढू लागली आहे. कामकाजाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी आता होऊ लागली आहे.
हर्षवर्धन पाटलांचाही कस लागणार
इंदापूर पंचायत समितीवर गेली 20 वर्षे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची सत्ता आहे. ते वर्चस्व राखण्यासाठी व तालुक्यातील जनतेशी संपर्क ठेवण्यासाठी, वैयक्तिक लाभाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या इंदापूर पंचायत समितीवर पुन्हा सत्ता आणण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांचाही कस लागणार आहे.