पुणे -भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुणे महापालिकेच्या आवारात झालेल्या हल्ल्याप्रकरणी शिवसेनेच्या शहर प्रमुखांसह 60 ते 70 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून हल्लेखोर शिवसैनिकांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
किरीट सोमय्या हल्ला प्रकरणात शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, पदाधिकारी चंदन साळुंके, किरण साळी, सूरज लोखंडे, रूपेश पवार, राजेंद्र शिंदे, सनी गवते यांच्यासह 60 ते 70 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल केलेल्या आरोपींमध्ये महिला शिवसैनिकांचा समावेश आहे. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते प्रशांत लाटे यांनी यासंदर्भात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विक्रम गौड तपास करत आहेत. सोमय्या यांच्याबरोबर असलेल्या पोलिसांनी त्वरीत हस्तक्षेप केला. सोमय्या यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, सोमय्या यांना दुखापत झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर मध्यरात्री याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल झाला. सोमय्या हल्ला प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शिवसैनिकांना पकडण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली.
सोमय्या यांना अडवून घोषणाबाजी
सोमय्या शनिवारी पुणे महापालिका आयुक्तांची भेट घेण्यासाठी महापालिकेत आले होते. जम्बो कोविड सेंटरमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केला असून ते महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यासाठी आले होते. त्यावेळी शिवसैनिकांनी सोमय्या यांना महापालिकेच्या आवारात अडवून घोषणाबाजी केली. शिवसैनिकांनी त्यांना धक्काबुक्की केली. झटापटीत सोमय्या यांचा पायरीवरून तोल गेल्याने त्यांना दुखापत झाली. शिवसैनिक सोमय्या यांच्या जीवितास धोका पोहचविण्यासाठी जमले होते. त्यांच्या हातात दगडही होते, असे लाटे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.