पुणे -प्रगत देशांतील शैक्षणिक संस्था “नेक्स्ट जनरेशन डिफेन्स टेक्नॉलॉजीज’च्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात आणि भारतानेही त्याचे अनुकरण केले पाहिजे, असे मत सदर्न कमांडचे कमांडंट लेफ्टनंट जनरल ए. के. सिंग यांनी व्यक्त केले.
संरक्षण तंत्रज्ञानातील आत्मनिर्भर भारताचे आमचे ध्येय साध्य करण्यासाठी वैज्ञानिक शोध, तांत्रिक आविष्कार आणि नवकल्पना यांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची माहितीही सिंग यांनी यावेळी दिली.
आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिघी यांच्या सहकार्याने “द रीजनल टेक्नॉलॉजी नोड’ हेडक्वार्टर सदर्न कमांडद्वारे “सदर्न स्टार आर्मी ऍकॅडेमिया इंडस्ट्री इंटरफेस’ या एक दिवसीय चर्चासत्र आणि प्रदर्शनाचे आयोजन नुकतेच दिघी येथे करण्यात आले होते. “संरक्षण तंत्रज्ञानातील आत्मनिर्भर भारताचे परिवर्तन’ ही कार्यक्रमाची थीम होती. यावेळी लेफ्टनंट जनरल एस. एस. हसबनीस (निवृत्त) प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. हसबनीस हे सन 2022 मध्ये लष्कराचे उपप्रमुख म्हणून निवृत्त झाले.
सिंग यांनी आत्मनिर्भर भारताचे महत्त्व सांगितले. प्रगत देशांणी संरक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या वापरावर भर दिला आणि युद्धसामुग्रीच्या महागड्या आणि अविश्वसनीय आयातीवरील अवलंबित्व कमी केले. यासाठीच अशा अकादमी महत्त्वाच्या असतात असे सांगून सिंग यांनी अकादमीचे महत्त्व अधोरेखित केले.
या कार्यक्रमात संरक्षण भागधारक, संशोधन आणि विकसन क्षेत्रातील संस्था, शैक्षणिक संस्था आणि खाजगी उद्योगांचा मोठा सहभाग होता. कार्यक्रमाचा एक भाग म्हणून 50 हून अधिक प्रतिनिधी आणि 18 प्रदर्शन स्टॉल प्रदर्शित करण्यात आले होते. दुसऱ्या सत्रात आत्मनिर्भर भारतसाठी योगदान देणाऱ्या उद्योग तज्ज्ञांनी मत मांडले. आज तयार होत असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर या वक्त्यांनी प्रकाश टाकला. तज्ज्ञ वक्त्यांच्या तांत्रिक चर्चा सत्रानंतर लष्कराच्या पुढाकाराला पाठिंबा देणारे उद्योग, शैक्षणिक आणि सशस्त्र दल यांच्यात पॅनेल चर्चा झाली.