रस्त्याच्या समस्येने नागरिक झाले हैराण

विकासनगरमधील परिस्थिती : चालणेही मुश्‍किल

सातारा – सातारा शहराचे उपनगर असलेल्या विकासनगर परिसरात वारंवार होत असलेल्या रस्त्याच्या खोदकामामुळे नागरिक अक्षरश: हैराण झाले आहे. नुकतेच विकासनगर येथील रस्त्याची मोठ्या प्रमाणात खोदकाम केल्याने या रस्त्याने वाहने सोडाच मात्र चालण्यासाठीही रस्ता शिल्लक उरलेला नसल्याने नागरिकांमधून संतप्त भावना व्यक्त होऊ लागला आहे.

सातारा शहराला लागून असलेल्या आणि खेड ग्रामपंचायतीच्या हद्दीत वसलेल्या विकासनगर परिसरात मोठ्या प्रमाणात शहरी लोकवसती आहे. शहरामध्ये तसेच औद्योगिक वसाहतीत काम करणारे अनेक नोकरदार विकासनगर परिसरात स्थायिक झाले आहेत. मात्र, सुरुवातीपासून या नागरिकांना नानाविध सुविधांसाठी नेहमीच झगडावे लागले आहे. विशेष म्हणजे या परिसरातील रस्त्यांची या-ना त्या कारणाने वारंवार खोदकाम सुरु असते.

गळतीचा प्रश्‍न असो अथवा इतर कोणतेही कारण असो. सध्यादेखील विकासनगर परिसरातील एकाठिकाणी रस्त्याचे इतक्‍या मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे की या रस्त्याने चारचाकी नव्हे, दुचाकी नव्हे तर नागरिकांना चालत जाणेही मुश्‍किल होऊन बसले आहे. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होताना दिसत आहे. दरम्यान, एकदाच काय असतील ती कामे करा आणि पुन्हा रस्ते खोदू नका अशा प्रतिक्रियादेखील नागरिकांमधून व्यक्त होताना दिसत आहे.

सध्या खोदकाम केलेल्या रस्त्याचा नियमित वापर करावा लागणाऱ्या नागरिकांच्या जाण्या-येण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. याशिवाय या नागरिकांना आपली वाहने कुठेही असुरक्षित ठिकाणी उभी करावी लागत आहे. त्यांच्या वाहनांचे नुकसान झाल्यास, अथवा वाहन चोरीस गेल्यास कुणाला जबाबदार धरायचे? असा सवालदेखील उपस्थित केला जात आहे. त्याशिवाय नागरिकांना विशेषत: महिलांना बाजारपेठेत जाण्यासाठी गल्लीबोळांचा आधार घ्यावा लागत आहे. रस्ता नसल्याने पर्यायी मार्ग शोधत मोठी पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे महिलांमध्ये संतप्त भावना व्यक्त होताना दिसत
आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.