मुंबई – कट्टर शिवसैनिक अशी ओळख असणारे ‘गुलाबराव पाटील’ हे सध्या शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते आहेत. गुलाबराव पाटील राज्यात जेव्हा पासून बंड झाले आहे तेव्हापासून वेगवेगळ्या कारणाने चर्चेत येत आहेत. आक्रमकपणा आणि धडाकेबाज वक्तव्य यांच्यामुळे त्यांची एक स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्यातच आता त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून, या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
नुकतंच, जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावात मंत्री गुलाबराव पाटील यांनी कव्वाली म्हणूत सर्वांचं लक्ष वेधल्याचं दिसून आलं आहे. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आणि याच कार्यकर्त्यांच्या आग्रहानुसार गुलाबराव पाटील यांनी प्रसिद्ध “चढता सुरज धीरे धीरे…’ ही कव्वाली गायली आहे. सध्या त्यांचा कव्वालीचा हा व्हिडिओ सोशलवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.
गुलाबराव पाटील यांना तोंडपाठ कव्वाली म्हणताना पाहून उपस्थितांनी त्यांना दाद दिल्याचंही या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोळीनंतर कट्टर शिवसैनिक अशी ओळख असणारे ‘गुलाबराव पाटील’ हे शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते झाले आहेत. सध्या ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात असल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, कव्वालीचा हा व्हिडिओ स्वतः गुलाबराव पाटील यांनी आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला असून, त्याखाली एक भलं मोठं कॅप्शन देखील लिहलं आहे. “नशिराबाद येथे कवी संमेलनाचे (मुशायरा) चे आयोजन करण्यात आले होते. यात रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी लोकाग्रहास्तव प्रसिद्ध गझल म्हणजेच कव्वाली “चढता सुरज धिरे धिरे…’ म्हटली आणि उपस्थित सर्वांना मंत्रमुग्ध केले.’ असं ते म्हणाले आहेत.