डेक्कन क्वीनवर झळकणार नागझिरातील लाल डोक्‍याचे पोपट

बोधलकसा पर्यटक निवासाची माहितीही होणार प्रसारीत

मुंबई  : मुंबई आणि पुणे या दोन शहरांदरम्यान धावणाऱ्या पुणे डेक्कन क्वीन एक्‍सप्रेसवर निसर्गसौदर्यांने बहरलेल्या नागझिरा अभयारण्यातील निसर्गाबरोबरच तेथे वावर असणाऱ्या लाल डोक्‍याचे पोपट, हरियाल (हिरवे कबुतर), विविध जातीचे गरूड, पोपट तसेच स्थलांतरीत पक्षांची दुर्मिळ चित्रे झळकणार आहेत. तसेच अभयारण्यातील एमटीडीसीच्या बोधलकसा पर्यटक निवासाची चित्रेही एक्‍सप्रेसवर झळकणार आहेत.

या उपक्रमाचे उद्‌घाटन उद्या, शनिवारी (14 डिसेंबर) सायंकाळी 5 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील प्लॅटफॉर्म क्रमांक 12 वरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार असून ते हिरवा कंदील दाखवून या सुशोभित एक्‍सप्रेसला रवाना करणार आहेत.

डेक्कन क्वीन ही रेल्वे महाराष्ट्राचा मानबिंदू असून तिच्या 17 बोगींवर ही चित्रे लावण्यात येणार आहेत. महाराष्ट्रात पर्यटन विकास महामंडळाची विविध ठिकाणी 23 पर्यटक निवासे आहेत. त्यापैकी नागझिरा अभयारण्यातील बोधलकसा या ठिकाणी महामंडळाचे अत्याधुनिक सोयी-सुविधांनीयुक्त प्रशस्त पर्यटक निवास आहे. या पर्यटक निवासाच्या बाजूला मोठा जलाशय आहे व सर्व बाजूंनी नागझिरा अभयारण्याची गर्द हिरवी झाडी आहे.

अभयारण्याच्या परिसरात बाराही महिने लाल डोक्‍याचे पोपट, हरियाल (हिरवे कबुतर), विविध जातीचे गरूड, पोपट तसेच स्थलांतरीत पक्षी इत्यादी दुर्मिळ पक्षांचा वावर असतो. परिसरात पळस व मोह वृक्ष फुलण्याच्या सुमारास खूप नेत्रसुखद दृष्य असते. आता या परिसरातील पक्षांची व निसर्गाची चित्रे डेक्कन क्वीन रेल्वेच्या बाह्य भागावर लावून या पर्यटक निवासाची प्रसिध्दी करण्यात येणार आहे.

या माध्यमातून पर्यटकांना नागझिरा अभयारण्य तसेच विदर्भाकडे आकर्षित करुन तेथील पर्यटनाला चालना देण्यात येईल, असे एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांनी सांगितले. अभिमन्यू काळे यांच्या संकल्पनेतून आणि राज्याच्या पर्यटन सचिव विनिता वेद-सिंगल, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांच्या मार्गदर्शनातून हा उपक्रम साकारत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.