मालदीवचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला शाहिद यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

नवी दिल्ली : मालदीवचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला शाहिद यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. सहाव्या भारत-मालदीव संयुक्त आयोगाच्या बैठकीसाठी अब्दुल्ला शाहिद भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आले आहेत.

मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांच्या नेतृत्वाखाली सरकारने पहिल्या वर्षात केलेल्या कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालदीवचे परराष्ट्र मंत्री शाहिद यांच्याकडे प्रशंसा केली. भारत आणि मालदीव यांच्यातील वाढत्या सहकार्याबद्दल आणि गेल्या वर्षभरातल्या द्विपक्षीय सहकार्याच्या सकारात्मक परिणामांबाबतही त्यांनी समाधान व्यक्त केले.

सहाव्या संयुक्त आयोगाच्या बैठकीदरम्यान होणाऱ्या चर्चेमुळे दोन्ही देशांना प्रगतीचा आढावा घेता येईल आणि उभय देशांमध्ये परस्परांना हितकारक सहकार्य अधिक वृद्धिंगत करण्याच्या महत्वाकांक्षी उपाययोजनांची आखणी करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मजबूत, लोकशाही प्रधान, समृद्ध आणि शांततामय मालदीवसाठी मालदीवच्या सरकारबरोबर भागिदारी करण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधान मोदी यांनी केला.

भारत-मालदीव संबंधांना दिशा देण्यात पंतप्रधान मोदी यांची दूरदृष्टी आणि कणखर नेतृत्वाबद्दल परराष्ट्रमंत्री शाहिद यांनी त्यांचे आभार मानले. मालदीवमध्ये सध्या राबवण्यात येत असलेल्या विविध विकास सहकार्य उपक्रमांमध्ये भारताच्या मदतीबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. “भारत प्रथम’ धोरणाप्रति तसेच भारताबरोबरचे संबंध अधिक वृद्धिंगत करण्यासाठी मालदीवचे नेतृत्व बांधिल असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.