खासगी कंपन्यांना पालिकेची सवलत नाहीच
पुणे – खासगी संस्था, मोबाइल कंपन्यांकडून शहरात विविध ओएफसी केबल टाकण्यात येतात. यासाठी रस्त्यांची खोदाई करावी लागते. पण, या दरांत सवलत न देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या कंपन्यांना खोदाईसाठी आता प्रतिरनिंग मीटर 10 हजार 155 रुपये मोजावे लागणार आहे.
तर केंद्र, राज्य शासनाच्या अंगिकृत संस्था, एमएनजीएल, बीएसएनएल, मेट्रो यांना खोदाई शुल्कात 50 टक्के सवलत देण्यात आली आहे.
अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांनी हे आदेश काढले. कंपन्यांना रस्ते खोदाईसाठी पालिकेने दोन वर्षांपूर्वी 10 हजार 155 रुपयांचे शुल्क निश्चित केले होते. या शुल्कवाढीस काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला.
त्यामुळे या शुल्कास मुख्यसभेने मान्यता दिली, तरी त्याची अंमलबजावणी होत नव्हती. त्यानंतर घटलेल्या उत्पन्नाचा दाखला देत ही शुल्कवाढ रद्द करण्याची मागणी करत प्रशासनावर दबाव आणण्यात आला होता.