बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान हा आपल्या कामातील समर्पणाविषयी ख्यातनाम आहे. लवकरच तो लालसिंह चा या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण आटोपणार आहे. आमीरची काम करण्याची पद्धत सर्वांपेक्षा वेगळी आहे, हे आता सर्वश्रुत आहे. आमीर वर्ष-दोन वर्षांत एखादाच चित्रपट करतो, तोही निवडक! हा चित्रपट पूर्णतः त्याच्यावर केंद्रीत असतो. चित्रीकरणाच्या काळात आमीरमध्ये दिसणारी तन्मयता वाखाणण्याजोगी असते.
“लालसिंह चढ्ढा’च्या व्यक्तिरेखेसाठी आमीरने आपल्या वजनाबाबत खूप मोठा धोका पत्करल्याचे सर्वांनीच पाहिले. पण आमीर मात्र यास नकार देतो. तो म्हणतो, “तुम्ही घाईगडबडीत काही करता तेव्हाच खरा धोका असतो. मी हे सर्व काही आरामात करत असतो. कारण मला दुसऱ्या कुठल्या कामाची काळजी नसते. उदाहरणार्थ, गेल्या वर्षभरात माझ्यामध्ये केवळ लालसिंहच भिनलेला आहे. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरच मी दुसऱ्या प्रोजेक्टचा विचार करेन. ‘
आमीरबाबत असं बोललं जातं की तो त्याच्या चित्रपटांचा “घोस्ट डायरेक्टर’ असतो. त्यामुळेच गेल्या काही वर्षांत तो रीमा कांगती, विजय कृष्ण, आचार्य अद्वैत चंदन यांसारख्या नवोदित दिग्दर्शकांसोबत काम करू लागला आहे. नवख्या दिग्दर्शकांच्या कामात सूचना-ढवळाढवळ-हस्तक्षेप सहज करता येतात. पण ही बाबही आमीर नाकारतो. तो म्हणतो, हे सर्व माध्यमांनी तयार केलेलं गॉसिपिंग आहे. प्रत्यक्षात मी डायरेक्टरचा ऍक्टर आहे. मी जेव्हा एखाद्या दिग्दर्शकासोबत काम करतो तेव्हा त्याची पूर्वपीठिका पहात नाही. वर्तमानात तो मला किती प्रभावित करतो आहे, त्याच्यात प्रतिभा किती आहे या गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या असतात. आता याबाबत एखादा दिग्दर्शकच खरं काय ते सांगू शकेल !