नवी दिल्ली – देशाचे सरन्यायाधीश एस.ए.बोबडे महिनाभराने सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे नव्या सरन्यायाधीशांच्या नियुक्तीची प्रक्रिया केंद्र सरकारने सुरू केली आहे. त्यातून बोबडे यांना उत्तराधिकाऱ्याच्या नावाची शिफारस करण्यास सांगण्यात आले आहे.
बोबडे 23 एप्रिलला सेवानिवृत्त होणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर, केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी बोबडे यांना उत्तराधिकाऱ्याची शिफारस करण्याची विनंती करणारे पत्र पाठवले आहे. प्रथेनुसार सर्वोच्च न्यायालयातील सर्वांत वरिष्ठ न्यायाधीशाची सरन्यायाधीशपदी नियुक्ती केली जाते. सरन्यायाधीशांकडून आलेली नावाची शिफारस कायदा मंत्री पंतप्रधानांपुढे ठेवतात. त्यानंतर पंतप्रधान नियुक्तीविषयीचा सल्ला राष्ट्रपतींना देतात. सर्वांत वरिष्ठ न्यायाधीशाच्या तंदुरूस्तीबाबत साशंकता असेल तर इतर न्यायाधीशांचा सरन्यायाधीश पदासाठी विचार केला जातो. सध्या बोबडे यांच्यानंतर न्यायाधीश एन.व्ही.रामणा हे सर्वोच्च न्यायालयातील सर्वांत वरिष्ठ न्यायाधीश आहेत. ते 26 ऑगस्ट 2022 या दिवशी सेवानिवृत्त होणार आहेत.