बेंगळुरू – देशी खेळ असलेल्या व अल्पावधीतच राजाश्रयासह लोकाश्रयही प्राप्त केलेली प्रो-कबड्डी लीग आता अखेरच्या टप्प्यावर आली आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून ही स्पर्धा आयपीएल स्पर्धेच्याच पावलावर पाऊल ठेवून प्रसिद्ध झाली होती. मात्र, स्टार खेळाडूंना सातत्याने येत असलेले अपयश व प्रायोजकांनी फिरवलेली पाठ यामुळे ही स्पर्धा गतवैभव गमावून बसली आहे. अर्थात देशी खेळांना कायम प्रोत्साहन देत असलेल्या प्रेक्षकांच्या तसेच सर्वात महत्त्वाचे खेळाडूंच्या दर्जावर या स्पर्धेतील सामन्यांची रंगत मात्र कायम राहिली आहे.
यंदाच्या मोसमात पाटणा पायरट्सने गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले असून दिल्ली दबंग, यूपी योद्धा, हरियाणा स्टीलर्स, जयपूर पिंक पॅंथर्स व बेंगळुरू बुल्स या संघांनी बाद फेरी गाठली आहे.
यंदा या स्पर्धेचा आठव्या मोसमाचा अंतिम सामना येत्या 25 फेब्रुवारीला होणार असून, त्यापूर्वी 21 आणि 23 फेब्रुवारीला प्ले-ऑफ (बाद फेरी) सामने होणार आहेत, असे संयोजक मशाल स्पोर्टसकडून सांगण्यात आले आहे.
यंदाच्या मोसमातील विजेतेपदाच्या शर्यतीत सहा संघ बाद फेरीसाठी पात्र ठरणार असून, 21 फेब्रुवारीला एलिमिनेटरचे दोन सामने होतील. या सामन्यांत विजयी होणारे दोन संघ 23 फेब्रुवारीला उपांत्य फेरीत खेळतील.