नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियामधील एका महिलेने संसदेत आपल्यावर बलात्कार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. यानंतर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी महिलेची माफी मागितली आहे. तसेच सरकारी कामकाज कशा पद्दतीने चालते यासंबधी चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. पीडित महिलेच्या आरोपानुसार, मार्च २०१९ मध्ये संरक्षण मंत्र्यांच्या कार्यालयात तिच्यावर बलात्कार करण्यात आला. बलात्कार करणारा आरोपीदेखील सरकारी पक्षासाठी काम करतो असे महिलेने सांगितलं आहे.
एका इंग्रजी वर्तमानपत्राने यासंबंधी माहिती दिली आहे. महिलेने स्थानिक प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, “एप्रिल महिन्याच्या सुरुवातील आपण पोलिसांसोबत याबाबतीत चर्चा केली होती. पण करिअरची चिंता असल्याने कोणतीही तक्रार दाखल केली नाही”. पोलिसांनीही एप्रिल २०१९ मध्ये तक्रारदार महिलेसोबत संभाषण झाल्याची आणि तिने तक्रार दाखल न करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे.
आपण संरक्षण मंत्र्यांच्या कार्यालयामधील वरिष्ठ कर्मचाऱ्यांना याबाबतची माहिती दिली होती असंही सांगितलं आहे. यानंतर आपल्याला कार्यालयातील एका बैठकीला हजर राहण्यास सांगण्यात आलं आणि तिथे छळ करण्यात आला असा आरोप महिलेने केला आहे. रेनॉल्ड्स यांनी महिलेच्या तक्रारीबद्दल आपल्याला सांगण्यात आल्याचं म्हटलं आहे. मात्र यावेळी त्यांनी पोलीस तक्रार करु नये यासाठी दबाव टाकल्याचा आरोप फेटाळला आहे.
दरम्यान पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी मंगळवारी महिलेची माफी मागत चौकशी करण्याचं आश्वासन दिलं. “हे असं व्हायला नको होतं, मी माफी मागतो,” असं पंतप्रधानांनी पत्रकारांना सांगितलं. “कामाच्या ठिकाणी महिला जास्तीत जास्त सुरक्षित राहाव्यात याची मी खात्री करत आहे,” असंही त्यांनी सांगितलं.