पुणे – काही दिवसांपूर्वीच येरवडा कारागृहाबाहेर फटाके फोडून एका गुंडाचा वाढदिवस साजरा करण्याचा प्रकार घडला होता. आता त्यानंतर आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमोल बधे आणि पप्पू गावडे यांच्या खूनातून निर्दोष मुक्तता झालेल्या मारणे टोळीचा म्होरक्या कुख्यात गुंड गजानन मारणेची थेट तळोजा कारागृहापासून पुण्यापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.
गजानन मारणेची सोमवारी सायंकाळी तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली. मारणेचे स्वागत करण्यासाठी कारागृहाबाहेर त्याचे हजारो समर्थक उपस्थित होते. त्याची एक्सप्रेस हायवेवरुन जंगी मिरवणूक काढली. त्यात ५०० हून अधिक चारचाकी गाड्या सहभागी होत्या.
टोलनाक्यावरील कर्मचारी नेहमी एकाही वाहनांना विनाटोल सोडत नाही. मात्र, गजानन मारणे याच्या शेकडो गाड्या दोन्ही नाक्यांवर टोल न भरताच वेगाने पुढे रवाना झाल्या. उर्से टोलनाक्यापर्यंत ही मिरवणूक सुरू होती. त्यानंतर समर्थकांच्या गाड्या वेगवेगळ्या मार्गाने रवाना झाल्या. कोथरुडमधील पौड रोड येथील घरी रात्री दोन-तीन गाड्यांसह गजानन मारणे घरी पोहोचला.