जयपूर – भाजपकडून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या टी-शर्टचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. त्यावरून राजस्थानचे मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी सोमवारी पलटवार केला. भाजपचे नेते अडीच लाख रूपये किमतीचे चष्मे वापरतात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मफलर 80 हजार रूपयांची आहे, असा दावा गेहलोत यांनी केला.
राहुल यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसने महत्वाकांक्षी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. त्या यात्रेत पायी चालणाऱ्या राहुल यांना ते परिधान करत असलेल्या टी-शर्टवरून भाजप लक्ष्य करत आहे. त्या टी-शर्टची किंमत 41 हजार रूपयांपेक्षा अधिक असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. त्याचा आधार घेऊन शहा यांनीही राहुल यांची खिल्ली उडवली.
राहुल परदेशी टी-शर्ट घालून भारत जोडायला निघाले असल्याचे त्यांनी नुकतेच म्हटले. त्यावर गेहलोत यांनी पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. भाजपकडून टी-शर्टवरून राजकारण केले जात आहे. खरेतर, कॉंग्रेसच्या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने भाजप अस्वस्थ झाला आहे, असे ते म्हणाले.