पुणे – पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरामध्ये पावसाची संततधार सुरू असल्यामुळे बहुतांश आयटीयन्स’ना वर्क फ्रॉम होम’ची मुभा देण्यात आली. गेले दोन दिवस आयटीयन्ससह या पावसाचा परिणाम फूड डिलेव्हरी साईट्स आणि कॅब सर्व्हिसवर देखील झाला.
हिंजवडी, खराडी, विमाननगर, पिंपरी-चिंचवड, कल्याणी नगर, मगरपट्टा या परिसरामध्ये खासगी कंपन्यांची संख्या अधिक आहे. या कंपन्यांमध्ये शहराच्या विविध भागांतून कर्मचारी ये-जा करतात. मात्र शहरांमध्ये उद्भवलेल्या पूरजन्य स्थितीमुळे अनेक कर्मचाऱ्यांना कंपनी ते घर असा प्रवास करताना अडचणी येत आहेत. या परिस्थितीचा विचार करत बहुतांश आयटी’ कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची मुभा दिली. सोमवारी आणि मंगळवारी बहुतांश कर्मचाऱ्यांनी घरुन काम करण्याचा पर्याय निवडला. तर कंपनीमध्ये पोहोचलेल्या कर्मचाऱ्यांना घरी जाण्यामध्ये अडचणी येऊ नयेत, यासाठी त्यांना लवकर घरी जाण्याची सूचना देण्यात आली.
यासह गेले दोन दिवस शहरातील स्विग्गी, झोमॅटो, उबेर इट आदी खाद्यपदार्थ पोहोचवणाऱ्या कंपन्यांच्या सेवेवर देखील परिणाम झाला. तर अनेक भागांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे कॅब सर्व्हिस’वर परिणाम झाला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतील पूल आणि रस्ते वाहतुकीसाठी बंद असल्याने आणि पाणी साचल्याने फूड डिलेव्हरी साईट्स’ आणि कॅब सर्व्हिस’ कंपन्यांनी सर्व्हिस अनअव्हेलेबल’चा मेसेज वापरकर्त्यांना देण्यात आला.