भौतिकशात्र अभ्यासक्रम-बदल प्रशिक्षण शिबिरास प्राध्यपकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी – विज्ञान आणि अभियांत्रिकी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जागतिक स्तरावर देखील विज्ञान आणि तंत्रज्ञानात भारतीय युवक आघडीवर आहेत. इटलीमध्ये आयसीटीपीच्या संचालकदावर महाराष्ट्राचे युवा अभियंते अतिश दाभोलकर यांची नियुक्ती गौरवास्पद आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विज्ञान तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. अरविंद शाळीग्राम यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्यूकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन केंद्र (पीसीसीओईआर) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पीसीसीओईआर यांच्या संयुक्त विद्यमाने, प्रथम वर्ष अभियांत्रिकी भौतिकशास्त्र विषयाच्या नवीन अभ्यासक्रमाचे प्राध्यापकांसाठी प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. या वेळी विद्यापीठ अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. एन. एम. मुजुमदार, सदस्य डॉ. कांदळकर, पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरीष तिवारी, विभाग प्रमुख प्रा. सोनाली कणसे आदींसह शंभरहून अधिक प्राध्यापक उपस्थित होते. डॉ. एन. एम. मुजुमदार म्हणाले की, अभ्यासक्रमात काळानुरूप बदल होणे आवश्यक आहे. त्यानुसार आजच्या तरुणाईला नवनवीन विषयांचे ज्ञान उपलब्ध करून देणे हे विद्यापीठाचे काम आहे. या शिबिरातून प्राध्यापकांना मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा विद्यार्थ्यांना उपयोग होईल असेही त्यांनी सांगितले.
प्रकल्प मूलभूत शिक्षण हे विदयार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यास उपयुक्त आहे. प्रथम वर्ष ते चतुर्थ वर्ष अभियांत्रिकी शिक्षणामध्ये नवनवीन कल्पना पुरस्कृत प्रकल्प विद्यार्थी साकारू शकतात. या शिक्षण पद्धतीमुळे संशोधनास पुरेसे पोषक वातावरण निर्माण होते व असे शिक्षण देण्यावर पीसीईटी नेहमीच प्रयत्नशील असते, असे पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरीष तिवारी यांनी प्रास्ताविकात सांगितले.
डॉ. रोहिणी पानाजकार यांनी प्रकल्प आधारित शिक्षण पद्धती राबविण्याबाबत मार्गदर्शन केले. प्रा. एस. व्ही. आरळीकर, प्रा. वी.के. चौधरी, डॉ. उमेश मोहरील यांनी प्रथम वर्ष अभियांत्रिकी मधील भौतिकशास्त्र विषयाच्या नवीन अभ्यासक्रमाचे उपस्थित प्राध्यापकांना प्रशिक्षण दिले. संयोजन प्रा. प्रिया ओघे, सूत्रसंचालन प्रा. दीपशिखा श्रीवास्तव व प्रा. संदीप बोरगावकर यांनी आभार मानले.