हैदराबाद – पोस्टमन येथील एका गावात निवृत्ती वेतनाचे धनादेश तसेच रोख रक्कम पोहोचविण्यासाठी आला होता. मात्र, तो स्वतः करोना बाधित असल्याचे त्याला समजलेच नव्हते. मात्र, आता त्याच्या संपर्कात आलेल्या जवळपास शंभर गावकऱ्यांनाही करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.
हाच पोस्टमन गेल्या काही वर्षांपासून या गावातील निवृत्ती वेतन धारकांना त्यांचे धनादेश तसेच रोख रक्कमेचे वाटप करण्यासाठी येतो.
मात्र, गेल्या एका आठवड्यात त्याने ज्या व्यक्तींना निवृत्तीवेतनाचे वाटप केले त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांनी करोना चाचणी केली असता त्यांनाही बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
ज्येष्ठ नागरिकांकडून त्यांच्या कुटुंबीयांनाही याची लागण झाल्याचे सिद्ध झाले आहे. यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून जवळपास प्रत्येक घरातील सर्व व्यक्तींची करोना चाचणी घेण्यात येत आहे. आतापर्यंत बाधितांच्या संख्येने शतकी टप्पा पार केला आहे.