पुणे -राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या विविध कार्यालयांच्या संचालकांची पदे रिक्त आहेत. केवळ दोन कार्यालयात पूर्णवेळ संचालक कार्यरत असून, उर्वरित पाच कार्यालयांच्या संचालक पदांची सूत्रे प्रभारीकडे आहेत. कामाच्या जलद निपटऱ्यासाठी पूर्णवेळ संचालकांची आवश्यकता आहे.
शिक्षण विभागातील संचालक पदाच्या पदोन्नतीसाठी तुकाराम सुपे, दिनकर टेमकर, शरद गोसावी, महेश पालकर, कृष्णकांत पाटील हे पाच अधिकारी रांगेत आहेत. पदोन्नतेची स्वप्ने अधिकाऱ्यांना पडत असून सेवानिवृत्त होण्यापूर्वी तरी पदोन्नती मिळणार का याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे. ठराविक कार्यालयातच पदोन्नती मिळावी, यासाठी या अधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे.
प्राथमिक शिक्षण संचालकपदी दत्तात्रय जगताप, बालभारतीच्या संचालकपदी दिनकर पाटील या दोघांच्याच पूर्णवेळ नियुक्त्या झाल्या आहेत. इतर कार्यालयांसाठी काही महिन्यांपासून प्रभारी अधिकारी नियुक्त केले आहेत.
पुणे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त व अध्यक्ष तसेच अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. बालभारतीचे संचालक दिनकर पाटील यांच्याकडे राज्य मंडळाच्या अध्यक्ष पदाची प्रभारी सूत्रे आहेत. प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांच्याकडे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयातील सहसंचालक दिनकर टेमकर यांच्याकडे विद्या प्राधिकरणाच्या संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे.
अधिकाऱ्यांची मक्तेदारी मोडीत काढण्याची गरज
आगामी 2021-22 चे नवे शैक्षणिक वर्ष सुरू होताना तरी संचालकांच्या पूर्णवेळ नियुक्त्या होण्याची आवश्यकता आहे. प्रभारी संचालक असलेल्या कार्यालयात शिक्षण उपसंचालक, प्रशासन अधिकारी, अधीक्षक यांच्यात कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद होत आहेत. काही अधिकारी तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून कार्यालयात तळ ठोकून बसल्याने त्यांची मक्तेदारी वाढली आहे. ही मक्तेदारी मोडून काढण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे.