नवी दिल्ली – देशात कोविडची तिसरी संभाव्य लाट येण्याची शक्यता असल्याने त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक घेऊन ऑक्सिजन उपलब्धतेचा आढावा घेतला.
देशात प्रेशर स्वींग ऍडसॉरब्शन पद्धतीचे 1500 ऑक्सिजन प्लांट उभारले जात असून त्याच्या कामाच्या प्रगतीचीही माहिती पंतप्रधानांनी घेतली. हे प्लांट शक्य तितक्या लवकर कार्यान्वित होतील याकडे लक्ष द्या अशी सुचना पंतप्रधानांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिली आहे. पीएम केअर्स फंडातून तसेच विविध मंत्रालये आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या योगदानातून हे प्लांट उभारले जात आहेत.
ऑक्सिजन प्लांटच्या हाताळणीबाबत हॉस्पिटल कर्मचाऱ्यांना योग्य ते प्रशिक्षण दिले जावे अशी अपेक्षाही मोदींनी यावेळी व्यक्त केली. प्रत्येक जिल्ह्यात यासाठीचे प्रशिक्षक उपलब्ध होतील याचीही दक्षता घ्या अशी सुचनाही मोदींनी केली आहे. ऑक्सिजन प्लांटच्या उभारणीच्या कामाबाबत राज्यांच्या अधिकाऱ्यांशीही वेळोवेळी संपर्क साधला जात आहे असेही मोदींनी यावेळी सांगितले.