– संजोग काळदंते
नवरात्र उत्सावामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच स्त्री शक्तीच्या राजकीय जागरला देखील सुरुवात झाली आहे. उत्सावाच्या माध्यमातून महिलांनी आपला संपर्क वाढविला आहे.
विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असल्याने उमेदवारी अर्ज भरण्याआधीच सर्व इच्छुक व संभाव्य उमेदवारांच्या घरातील महिला मंडळीनी गावोगावी नवरात्र उत्सव मंडळांना भेटी देण्यास सुरुवात केली आहे. गावोगावी जाऊन त्या महिलांच्या गाठीभेटी घेत आहेत. सर्वसामान्य जनतेला भेटण्याची ही नामी संधी साधून मतदार राजासोबत आपला जनसंपर्क वाढवत आहेत.
आपणच निवडून येऊ व आपणच शिवनेरीचे शिलेदार होऊ, असा आत्मविश्वास सर्वच राजकीय पक्षाच्या संभाव्य व इच्छुक उमेदवारांमध्ये दिसत आहे. राष्ट्रवादीचे युवा नेते अतुल बेनके यांच्या पत्नी गौरी बेनके यांनी देखील जनसंपर्क वाढविला असून, प्रत्येक ठिकाणी जाऊन सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करून त्यांच्या समस्या समजून घेत आहेत. तसेच जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांची कन्या देखील तालुक्यात प्रचार करताना दिसत आहेत. तसेच आमदार शरद सोनवणे यांनी देखील आपली मोर्चेबांधणी अतिशय नियोजनबद्ध केलेली आहे. विधानसभेसाठी तिहेरी किंवा चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. नवरात्र उत्सव सुरू असल्याने तालुक्यातील प्रत्येक गावात महिला भगिनींचा उत्सवातील सहभाग आणि विविध कार्यक्रमांतील उपस्थिती वाढलेली दिसत आहे.