पुरंदर-हवेलीमधून संजय जगताप, तर भोरमधून आमदार थोपटेंचे नाव जाहीर
पुणे जिल्ह्यात आघाडीतील कॉंग्रेसने उमेदवार घोषित करण्यात आघाडी घेतली असून पितृपक्ष संपताच त्यांनी उमेदवारांची पहिली यादी घटस्थापनेच्या मुहुर्तावर घोषित केली आहे. जिल्ह्यात अपेक्षेप्रमाणे भोर विधानसभा मतदारसंघातून संग्राम थोपटे, तर पुरंदर-हवेली मतदारसंघातून जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांचे नाव जाहीर केले आहे. आता भाजप-शिवसेना व राष्ट्रवादी कधी उमेदवार जाहीर करणार? याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.
विधानसभा निवडणूक सोमवारी (दि. 23) जाहीर झाल्यानंतर शुक्रवारपासून (दि. 27) उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. त्या आधीच कॉंग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करून निवडणुकीचे रणशिंग फुंकले होते. तर अद्यापही युतीचा “झोल’ मिटला नसल्याने भाजप-शिवसेतील इच्छुक “गॅस’वरच आहेत. दरम्यान, जिल्ह्यात जुन्नरच्या जागेवरून आघाडीत तिढा सुरू असून तो कधी सुटतो व ही जागा कॉंग्रेस की राष्ट्रवादीच्या गोटात जाते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
भोर विधानसभा मतदारसंघात भोर, वेल्हे, मुळशी या तीन तालुक्यांचा समावेश असून गेल्या कित्येक वर्षांपासून हा गड कॉंग्रेसने आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवले आहे. 2014च्या निवडणुकीत आमदार संग्राम थोपटे यांना शिवसेनेचे उमेदवार कुलदीप कोंडे यांनी चांगलाच घाम फोडला होता. त्यामुळे पाच वर्षांतील छोटी चूकही 2019च्या विधानसभा निवडणुकीत भोगावी लागेल, याची जाण ठेवत विकासकामांचा धडाका लावला तर विरोधकांनी त्यांच्यावर विविध आरोपही केले; मात्र त्याला न जुमानता त्यांनी कामांचा धडाका सुरूच ठेवला होता, त्यामुळे यंदा हॅट्ट्रिक करण्यासाठी संग्राम थोपटे सज्ज झाले असून त्यांनी प्रचारही सुरू केला आहे. त्यात आता पहिल्याच यादीत नाव घोषित झाल्याने ते जोमाने प्रचाराला लागणार आहेत. त्यामुळे आता मतदार विरोधी उमेदवाराला की पुन्हा थोपटेंनाच आमदार बनवणार हे 24 ऑक्टोबरला समजेलच.
पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघात पुरंदर तालुक्यासह हवेली तालुक्यातील काही गावांचा समावेश होतो. गेल्या दोन टर्मपासून हा मतदारसंघ शिवसेनेने बालेकिल्ला केला असून मंत्री विजय शिवतारे हे लोकप्रतिनिधी म्हणून येथील काम पाहत आहेत. दरम्यान, आघाडीत हा मतदारसंघ कॉंग्रेसकडे आला असून येथील उमेदवार म्हणून संजय जगताप यांचे नाव पहिल्या यादीत आले आहे. त्यापूर्वीच त्यांनी मंत्री शिवतारे यांच्यावर विरोध आरोप करीत जेरीस आणले आहे. तर शिवतारे मी केवळ विकासकामे करणारा लोकप्रतिनिधी असल्याचे सांगत आहेत, त्यामुळे मतदार आता कोणाच्या पारड्यात मते टाकणार हे पाहण्यासाठी जवळपास 25 दिवसांची “कळ’ काढावी लागणार आहे.
आता बंडखोरीकडे लक्ष
लोकसभा निवडणुकीत पुरंदर विधानसभा मतदारसंघ कॉंग्रेसला सोडण्याच्या अटीवर संजय जगताप यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना मदत केली होती. त्यामुळे येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस बंडखोरी करण्याची शक्यता कमीच आहे. तर भोर विधानसभा मतदारसंघात निवडणूक झाल्यानंतर कॉंग्रेसने खासदार सुळे यांना मदत केली नसल्याचे आरोप-प्रत्यारोप झाले होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विशेषत: मुळशी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी हा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा यासाठी आग्रह ठेवला होता; मात्र आता कॉंग्रेसचा उमेदवार जाहीर झाल्याने आता येथे राष्ट्रवादीचे इच्छुक बंडखोरी करणार? की लोकसभेच्या अटीप्रमाणे संग्राम थोपटे यांना मदत करणार हे पाहणे औत्सुक्याचे राहील.