विकसित पेक्षा अविकसित भागात जादा कर
पिंपरी – पालिकेच्या असमान मिळकत कर आकारणीमुळे अविकसित भागावर अन्याय होत असून महापालिकेने “एक शहर, एक कर’ आकारणी का होत नाही, असा सवाल एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन असोसिएशनने (इसीए) केला आहे.
याबाबत असोसिएशनचे अध्यक्ष विकास पाटील यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरात मिळकत कर आकारणी व कर संकलन बाबत 31 मार्च 2015 मध्ये परिपत्रक जारी करण्यात आले आहे. प्रभागवार पद्धतीने करण्यात येणारी ही कर आकारणी अन्यायकारक असल्याचे कर आकारणीवरुन स्पष्ट होत आहे. “अ’ प्रभागात सर्व जास्त म्हणजेच 29.94 टक्के दराने वसुली होत आहे. शहरातील सर्वात जास्त विकसित “ड’ प्रभागाला हा दर 14.97 टक्के एवढा आहे. अर्थात जवळपास दुप्पट दर आकारला जात असल्याचे दिसून येत आहे.
एका भागाला एक तर दुसऱ्या भागाला दुसरा दर म्हणजेच जादा दर आकारल्या जाणाऱ्या नागरिकांची फसवणूक व पिळवणूक उघड होत आहे. शहराची आजची प्रभागवार प्रगती व सुधारणा पाहता “ड’ प्रभाग परिसर हा शहरातील सर्वात प्रगत व सर्व सुखसोयींनी सज्ज व उच्चभ्रू असा परिसर आहे. परंतु, त्याच प्रभागाला कर धोरणात सर्वात जास्त सवलत दिली आहे. त्यामुळे अपेक्षे पेक्षा कमी कर वसुली रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा होत आहे. नव्याने निर्माण झालेल्या प्रभागांची कर आकारणी दर पत्रिका अद्याप उपलब्ध नाही.