लोणी देवकर, (वार्ताहर) – बारामती लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा बड्या राजकीय नेत्यांच्या भाषणाने रविवारी (दि. 5) थंडावल्या. दरम्यान, या सभांमुळे इंदापूरचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे हे मात्र नक्की! आता भिस्त आहे ती मतदारांवरच.
रविवारी तालुक्यातील अनेक कार्यकर्ते इंदापूर येथे शरद पवार आणि अजित पवार यांच्या सभेला उपस्थित होते. दरम्यान, राष्ट्रवादीचे दोन गट पडले असून दोन्ही गटाचे मातब्बर उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान, इंदापूर विधानसभा मतदारसंघात आज शरद पवार, अजित पवार यांची सभा पार पडली; मात्र दोन्ही गटांना गर्दी जमवाजमव करताना दमछाक झाली.
शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ शरद पवार, माजी मंत्री अनिल देशमुख, सुनील केदार, खासदार अमोल कोल्हे ,सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांची सांगता सभा झाली.तर महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री दत्तात्रय भरणे, हर्षवर्धन पाटील, यशवंत माने आदींसह तालुक्यातील मात्तबर नेत्यांच्या उपस्थित सांगता सभा पार पडली. एकंदरीत रविवारी सभांची रेलचेल असल्याने कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली होती. तर राजकीय भाषणांच्या फै-यांनी वातावरणही चांगलेच ढवळले आहे.
तालुक्यातील मतदारांना लक्ष्मीदर्शन
तालुक्यातील बड्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांकडून तालुक्यात मतदारांना लक्ष्मी दर्शन घडवीत असल्याचे बोलले जात आहे.मात्र काही ठिकाणी मतदारांना लक्ष्मी दर्शन घडवीत असताना देवाच्या शपथा, गुलाल, देव आदी कल्पकृती लढवली जात असल्याची चर्चा गावागावांतर रंगली आहे.