पुणे – लोकसभा निवडणुकीत हाय व्होल्टेज लढत असलेल्या बारामती लोकसभा निवडणुकीवर राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे. पवार विरोधात पवार असा हा सामना होणार असला, तरी राष्ट्रवादी पक्षावर ताबा मिळवलेल्या अजित पवारांना बारामतीसाठी आधीच इंदापूर, पुरंदरमधून विरोधाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पुणे शहराचा ८० टक्के भाग असलेल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघातून मोठ्या मदतीची अजित पवारांना अपेक्षा आहे.
बारामतीमधून राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून अद्याप अधिकृतपणे सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही. तरीही, सुनेत्रा पवार यांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. त्यामुळे त्यांनी भेटीगाठीही वाढविल्या आहेत. बारामती लोकसभेत खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा बराचसा भाग येतो. यात पुणे शहरातील सुमारे सव्वापाच लाख मतदारांचा समावेश आहे.
या भागात प्रामुख्याने राष्ट्रवादी आणि भाजपचे प्राबल्य आहे. तर, राष्ट्रवादीचा काही भाग असला तरी ते राष्ट्रवादीत फूट पडल्याने तो विखुरलेला आहे. त्यामुळे या मतदारसंघात अजित पवारांना भाजपची मदत लागणार असून, नुकत्याच झालेल्या मेळाव्यातही पवार यांनी खडकवासला परिसरात घड्याळाला मतदान होत नसल्याची चिंता व्यक्त केली होती.
या भागात भाजपने सुनेत्रा पवारांसाठी प्रचार सुरू केला असला, तरी अजित पवारांचे काही ठराविक पदाधिकारीच मैदानात असून अनेक पदाधिकारी सुनेत्रा पवार अथवा अजित पवार येतात त्याच वेळी प्रचारात दिसत आहेत.
तसेच मतदारांच्या भेटीगाठीऐवजी पक्ष पदाधिकाऱ्यांच्या घरीच पाहुणचार घेण्यात वेळ घालविला जात आहे. मेळावे, उमेदवार नसताना घरोघरी जाऊन प्रचार पत्रके, पक्षाची माहिती, चिन्हाची माहिती पोहचविण्याची कोणतीही तसदी स्थानिक पातळीवर घेतली जात नसल्याची खंत कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. तर, पक्षाने नेमलेले पदाधिकारीही भाजप नगरसेवकांना मदत मागत आहेत. तसेच, दादांकडून पदे देण्यात आलेले नेते स्वत:च्या व्यवसायातच व्यस्त असल्याचे खासगीत सांगितले जात आहे. यामुळे खडकवासला मतदारसंघात घड्याळाचा ठोका चुकल्याची राजकीय चर्चा आहे.