सिंधुदुर्ग – सिंधुदुर्गामध्ये चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या श्रेय वादानंतर पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध राणे असा सामना पाहायला मिळाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सिंधुदुर्ग दौऱ्याला 24 तास होत नाहीत. तेच माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेला झटका दिला आहे.
कुडाळ पंचायत समितीचे शिवसेनेच्या तीन सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. माजी पंचयात समिती सभापती आणि विद्यमान सदस्य राजन जाधव, सुबोध माधव, प्राजक्ता प्रभू यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
निलेश राणे यांचे कट्टर समर्थक विशाल परब व दादा साईल यांचा या प्रवेशात मोठा हात आहे. कुडाळ पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे 10 संख्याबळ, तर भाजपचे संख्याबळ 8 आहे. एका वर्षापूर्वी कुडाळ पंचायत समितीच्या सभापतींनी शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केला होता. तीन पंचायत समिती सदस्यांच्या भाजपमध्ये प्रवेशामुळे भाजपचे संख्याबळ 8 वरून 11वर आले आहे.