पुणे – गुन्हेगारांचे कर्दनकाळ म्हणून पोलिसांना ओळखले जाते. मात्र, एका सराईत गुन्हेगारासाठी पोलीसच देवदूत ठरल्याचा प्रत्यय जनता वसाहत परिसरात आला आहे. वडिलांसोबत झालेल्या भांडणातून गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या एका 25 वर्षीय सराईत गुन्हेगाराचे दत्तवाडी पोलिसांनी प्राण वाचविले.
सोमवारी (दि.3) सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास दत्तवाडी पोलीस ठाण्याचे बीट मार्शल झणझणे व श्रीमंगले हे दोघे नेहमीप्रमाणे गस्तीवर होते. त्यावेळी त्यांना फोनद्वारे कळवले की, जनता वसाहत गल्ली क्रमांक सात येथे एक तरुण गळफास घेत आहे. त्यानुसार दोघांनी क्षणाचाही विलंब न करता अवघ्या काही मिनिटांत ठिकाण गाठले. त्यावेळी घराचा दरवाजा आतून बंद होता. मात्र, खिडकीतून पाहिले असता, तो तरुण पंख्याला लटकून गळफास घेत असल्याचे निदर्शनास आले.
प्रसंगावधान राखत दोघांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर एकाने तरुणाला खालून उचलून धरत दुसऱ्याने गळ्यातील फास सोडवला. तरुणाचा श्वास गुदमरला होता. तत्काळ रिक्षात घालून उपचारासाठी त्याला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले.
दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे यांनी सांगितले की, आत्महत्येचा प्रयत्न करणारा तरुण रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून तो एका गुन्ह्यात कारागृहात शिक्षा भोगतो आहे. त्याला पॅरोलवर काही दिवस घरी सोडण्यात आले होते. दरम्यान, वडिलांसोबत झालेल्या भांडणातून त्याने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी वेळीच घटनेचे गांभीर्य ओळखून त्याचे प्राण वाचवले.