पिंपरी, (प्रतिनिधी) – महापालिकेच्या झोनिपू विभागातील अधिकारी आणि चिंचवड पोलीस ठाण्यातील अधिकारी हे सात मीटर रस्त्यावर दोन्ही बाजूंनी तिहेरी पार्किंग करतात. यामुळे येथील सोसायटीमधील नागरिकांना आपली वाहनेही बाहेर काढता येत नाही. त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता ते नागरिकांच दादागिरीची भाषा करतात. या त्रासाला नागरिक कंटाळले आहेत.
चिंचवडगावात महापालिकेची इमारत असून एका बाजूला पोलीस ठाणे तर दुस–या बाजूला झोपडपट्टी पुनर्वसन विभाग आणि एलबीटीचे कार्यालय आहे. तसेच पोलिसांनी अपघातग्रस्त भंगार झालेली वाहने आसपासच्या सोसायटीच्या भिंतीलगत लावलेली आहेत. या भंगार वाहनांमुळे या परिसरात साफसफाई करता येत नाही. गेल्या आठ ते दहा वर्षांपासून ही वाहने येथे पडलेली आहेत.
या परिसरात सात मीटरचा रस्ता असून अनेक सोसायट्या आहेत. पोलीस ठाण्यातील अधिकारी व महापालिकेच्या कार्यालयातील अधिकारी सात मीटरच्या या रस्त्यावर तिहेरी पार्किंग करतात. अनेकदा वाहने पार्क करताना सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोर वाहनांचा काही भाग येतो. त्यामुळे स्थानिक नागरिकांना आपली वाहने बाहेर काढता येत नाही.
२० फेब्रुवारी रोजी येथील एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्यावेळी रस्त्यावर पार्किंग केलेल्या अधिका–यांच्या वाहनांमुळे शववाहिनी आत नेता आली नाही. त्यामुळे स्टेचरवरून मृतदेह रस्त्यावर आणावा लागला. जर आगीसारखी दुर्घटना घडल्यास अग्निशामक दलाचा बंबही आता आणता येणार नाही, अशी येथील स्थिती आहे.
पोलीस ठाण्याच्या खाली आणि आसपासच्या परिसरात पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने ठेवली आहेत. या वाहनांसाठी महापालिकेने जागा उपलब्ध करून दिल्यास ही समस्या सुटेल. – राजेंद्र गावडे, माजी नगरसेवक (फोटो आहे)
पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना पोलीस ठाण्याच्या मागील बाजूच्या रस्त्यावर वाहने पार्क करू नये, अशी सूचना दिली आहे. संबंधित सोसायट्यांकडून लेखी तक्रार प्राप्त झाल्यावर महापालिकेच्या कार्यालयात याबाबत पत्र देण्यात येईल. – जितेंद्र कोळी, वरिष्ठ निरीक्षक, चिंचवड पोलीस ठाणे.