विभागीय कार्यालयावर शुभेच्छांचा वर्षाव
पिंपरी – नववर्षाच्या पहिल्याच दिवशी “प्रभात’च्या पिंपरी-चिंचवड विभागीय कार्यालयाचा वर्धापनदिन बुधवारी (दि. 1) उत्साहात पार पडला. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात झालेल्या स्नेहमेळाव्याला मान्यवरांनी हजेरी लावत “प्रभात’ला “शुभेच्छा’ दिल्या.
पिंपरी-चिंचवड शहर आणि मावळ परिसरातील असंख्य वाचकांच्या शुभेच्छांची शिदोरी घेत “प्रभात’ने 90 व्या वर्षांत पदार्पण केले. ध्येयनिष्ठ, व्यासंगी आणि विवेकी पत्रकारितेची कास धरत गेल्या 89 वर्षांपासून दैनिक “प्रभात’ने समाजोन्नतीचा वसा अबाधितपणे सुरू ठेवला आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात दैनिक “प्रभात’ पिंपरी-चिंचवड विभागीय कार्यालयाच्या वतीने स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. दैनिक “प्रभात’वर मनापासून प्रेम करणाऱ्या वाचकांनी आणि हितचिंतकांनी प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह आणि प्रांगण गर्दीने अक्षरशः फुलून गेले होते. सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, उद्योग, शिक्षण, सामाजिक यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कार्यक्रमाला हजेरी लावत शुभेच्छांचा वर्षाव केला.
सोहळ्याची सुरुवात दैनिक “प्रभात’चे व्यवस्थापकीय संचालक आनंद गांधी, सरव्यवस्थापक बी. एल. स्वामी, कार्यकारी संपादक अविनाश भट यांच्या मुख्य उपस्थितीत महापौर माई ढोरे, स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी, उपमहापौर तुषार हिंगे, शिवसेनेचे गटनेते राहूल कलाटे, जगन्नाथ काटे, संतोष सौंदणकर, सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या लोणावळा संकुलचे संचालक डॉ. एम. एस गायकवाड, नगरसेवक पंकज भालेकर, आनंदा यादव, रोहित खर्गे, पिंपरी-चिंचवड कार्यालय प्रमुख शिरीष समुद्र व अन्य मान्यवरांच्या सायंकाळी साडेसहा वाजता हस्ते दीपप्रज्ज्वलनाने झाली. यानंतर सुमारे अडीच तास चाललेल्या या स्नेहमेळाव्यात शहरातील मान्यवरांसह “प्रभात’चे वाचक, जाहिरातदार, हितचिंतक, विक्रेत्यांनी हजेरी लावली. उत्तरोत्तर रंगलेला हा सोहळा अत्यंत आनंदात साजरा झाला.