“प्रभात’सह नागरिकांच्या पाठपुराव्यास यश
शिंदे वासुली – शिंदे (ता. खेड) येथील ग्रामस्थांनी एमआयडीसी प्रशासनाकडे मागणी केलेल्या वासुलीफाटा ते शिंदे रस्ता दुरुस्तीच्या कामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. यासंदर्भात दैनिक “प्रभात’मध्ये वृत्त प्रसिद्ध करून एमआयडीसी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी दैनिक “प्रभात’चे आभार व्यक्त केले. एमआयडीसी टप्पा दोनमधील सर्वच प्रमुख रस्त्यांची दुरुस्ती कामाला एमआयडीसी प्रशासनाने पावसाळा संपल्यानंतर तातडीने सुरुवात केली.
परंतु टप्पा दोन मधील शिंदे, वासुली, सावरदरी, भांबोली, खालुंब्रे या गावांतील प्रमुख रस्ते की जे देखभाल दुरुस्तीसाठी जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहेत. त्या सर्वच रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. शासनाच्या या दोन्ही विभागाच्या ‘आम्ही नाही ते करणार’ या वादामुळे औद्योगिक वसाहतीतील गावांचा रस्त्याला कोणीच वाली नसल्याचे चित्र निर्माण झाले.
शिंदेंच्या ग्रामस्थांनी तर वासुली फाटा ते शिंदे गाव ते प्रॉटॉन कंपनी पर्यंतच्या रस्त्त्याची एमआयडीसीने तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला होता. अखेर एमआयडीसी प्रशासनाने नागरिकांची मागणी व होणारी गैरसोय लक्षात घेऊन रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे.
आमचे प्रमुख रस्ते नुतनीकरण व दुरुस्ती करुन वाहतूक सुरळीत चालण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत;परंतु अनेक रस्ते आमच्याकडे वर्ग न केल्याने आम्हाला प्रस्ताव पाठवणे, निधी टाकण्यासाठी अडचणी येतात, पर्यायाने ग्रामस्थांनी मागणी केली तरी काम करणे शक्य होत नाही. तरीही नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शिंदे रस्त्याच्या दुरुस्ती करतोय. पुढील काळात या सर्व रस्त्यांची देखभाल दुरुस्तीचे अधिकार रितसर आम्हाला प्राप्त झाल्यास रस्ते चकाचक करता येईल.
अतुल ढोरे, उपअभियंता, चिंचवड एमआयडीसी असणाऱ्या गावांमधील सगळ्याच रस्त्यांची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी आता एमआयडीसी प्रशासनाची आहे. त्यामुळे एमआयडीसीने टप्पा दोन मधील सगळ्या रस्त्याची कामे त्यांचेच रस्ते म्हणून करावीत. एमआयडीसीने मागणी केल्यास जिल्हा परिषदेकडून रस्ते वर्ग केल्याचे रितसर पत्र दिले जाईल.
– शरद बुट्टे पाटील,सदस्य, जिल्हा परिषद