मोशी, (वार्ताहर) – मोशी गाव पिंपरी चिंचवड महापालिकेत समाविष्ट झाल्यापासून बहुतांश भागात विकास, रस्ते, उद्याने विकसित झाली आहेत. महापालिकेच्या उद्यान विभागाकडून मोशी परिसरात उद्यान विकसित करण्यात आली आहे. याचा उपयोग येथील रहिवाशांना होत आहे. परंतु उद्यानात सुरक्षारक्षक नसल्याने प्रेमीयुगलांचा वावर वाढला आहे.
त्यामुळे उद्यानात लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व महिलांना फिरणे कठीण झाले आहे. येथील उद्यानात सुरक्षारक्षक नियुक्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
महापालिकेच्या माध्यमातून मोशी प्राधिकरणामध्ये दोन उद्याने विकसित करण्यात आली आहेत. त्यापैकी एका उद्यानात सुरक्षारक्षक नसल्याने या उद्यानात उद्यान बंद असतानाही छुप्या मार्गाने प्रेमीयुगल येऊन बसतात. पेठ क्रमांक चारमधील पै. भगवान लोंढे उद्यान आणि पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण उद्यान अशी दोन वेगवेगळ्या संकल्पनेनुसार आकर्षक पद्धतीने उद्याने उभारून ती सुशोभीत करण्यात आली आहेत.
सध्या उद्यानाच्या सकाळी सात ते दहा आणि सायंकाळी चार ते आठ या वेळेत नागरिक त्यांचा सहकुटुंब आनंद घेत आहेत. पाच वर्षांपूर्वी नव्याने सुशोभित व विकसित केलेल्या या दोन उद्यानांत नागरिकांची मोठी गर्दी पाहण्यास मिळते. नागरिक आपल्या कुटुंब, मित्रमंडळी, नातेवाइकांसह या उद्यानांचा मनमुराद आनंद घेत आहेत.
उद्यानात असलेल्या सोयीसुविधा
मोशी येथील दोन्ही उद्यानात लहान मुलांसाठी खेळणी, ज्येष्ठांना बसण्यासाठी कट्टे, चालण्याच्या व्यायामप्रेमींसाठी जॉगींग ट्रॅक, बॉटल पाम ट्री सारखी विविध प्रकारची मोठी झाडे, लॉन, शोभेची आणि विविध प्रकारच्या फुलझाडांनी ही उद्याने बहरलेली आहेत. दोन्हीही उद्यानात बागकाम करणारे कर्मचारी उपलब्ध असल्याने वेळोवेळी येथील लॉन, झाडे, झुडपे यांना पाणी देऊन, त्यांची मशागत करून देखभाल केली जात आहे.
कै. भगवान लोंढे उद्यान हे वस्तीमध्ये असल्याने येथे प्रेमीयुगल येत नाहीत. मात्र, नवनगर विकास प्राधिकरण उद्यान हे वस्तीच्या ठिकाणी नसून, एकांतात असल्याने येथे प्रेमीयुगल घुसखोरी करून प्रवेश करत आहेत. सुरक्षारक्षक नसल्याने त्यांना कोणीही अडवत नाही. ही बाब अन्य नागरिकांना त्रासदायक ठरत आहे.
ओपन जिम सुरू करा
महापालिकेने शहरातील बहुतांश उद्यानात नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी ओपन जिमचा प्रयोग केला आहे. याला नागरिकांसह लहान मुलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु मोशी येथील उद्यानात जॉगिंग ट्रॅक आहे परंतु ओपन जिम नसल्याने शारीरिक कसरती करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने येथे ओपन जिम संकल्पना राबविणे गरजेचे आहे.
मोशीकरांच्या मागणीनुसार पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागााच्या वतीने दोन उद्याने विकसित करण्यात आली आहेत. त्यामुळे मोशी परिसरातील लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांची सोय झाली आहे. परंतु उद्यानाला सुरक्षारक्षक नसल्याने टवाळखोर, प्रेमीयुगलांचा वावर वाढला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, ज्येष्ठ, महिला यांना उद्यानात फिरताना लाज वाटत आहे. त्यामुळे येथे सुरक्षारक्षक नियुक्त करून उद्यानाची शिस्त पाळली जाणे गरजेचे आहे. – स्थानिक नागरिक. मोशी.