बीजिंग – चीनमध्ये सोमवारी मध्यरात्री झालेल्या भूकंपामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या १३१ वर पोचली आहे. त्यातील गान्सू भागात ११३ जण ठार झाले आहेत. तर शेजारील किनघाइ प्रांतातील मृतांची संख्या १८ इतकी झाली आहे. अजूनही १६ जण बेपत्ता आहेत. या दोन्ही प्रांतात मिळून ७०० लोक जखमी झाले आहेत. या भूकंपामुळे १५.३ दशलक्ष युआन (२.१६ दशलक्ष डॉलर) किंमतीच्या मालमत्तेची हानी झाली आहे.
भूकंपामुळे पडलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखालून ७४ लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. तर ४,२९८ लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे, असे चीनच्या आपत्कालिन व्यवस्थापन मंत्रालयाने म्हटले आहे. भूकंपामुळे १ लाख ५५ हजार ३९३ घरांचे नुकसानझाले आहे. किनघाइ प्रांत हा तिबेटला लागून असून भूस्तरांच्या हालचालींमुळे हा भाग भूकंपप्रवण बनला आहे.