- नवीन 260 रुग्णांची भर, 199 रुग्णांना डिस्चार्ज
पिंपरी – गेल्या काही दिवसांपासून रोज नव्याने बाधित होणाऱ्या रुग्णांपेक्षा रोज करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक होती. परंतु बुधवारी बाधितांची संख्या पुन्हा एकदा करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांपेक्षा अधिक झाली आहे. बुधवारी दिवसभरात 260 जणांना करोनाची बाधा झाली तर 199 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आकडे पुन्हा बदलणे चिंताजनक असले तरी मृतांच्या संख्येत घट झाल्याने दिलासादायक स्थिती आहे. आज दिवसभरात तीन करोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यात शहरातील एक तर शहराबाहेरील दोन रुग्णांचा समावेश आहे.
शहरात आजपर्यंत 86 हजार 114 जणांना करोनाची लागण झाली आहे. तर आजपर्यंत 2109 जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी चार वाजेपर्यंत शहरातील 244 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील 16 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच आज दिवसभरात 3 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील 1 व शहराबाहेरील 2 रुग्णांचा समावेश आहे. सद्यस्थितीत शहरात 1662 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामध्ये शहराबाहेरील 286 रुग्णांचाही समावेश आहे.
आज दिवसभरात 199 रुग्णांना घऱी सोडण्यात आले. आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 82,317 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 2039 संशयित रुग्णांना महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अद्याप 1640 रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.