पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व टपरीधारक, हातगाडी, पथारीवाले या पथविक्रेत्यांचे वॉर्डनिहाय सर्वेक्षण केले जाणार आहे. या कामासाठी येणाऱ्या खर्चासह विविध विकास कामांसाठीच्या 41 कोटी 91 लाख खर्चास स्थायी समितीने बुधवारी (दि.21) झालेल्या सभेत मंजुरी दिली.
सभेच्या अध्यक्षस्थानी संतोष लोंढे होते. शहरातील पथ विक्रेत्यांचे खासगी संस्थेमार्फत 30 दिवसांत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. येत्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात सर्वेक्षण होणार आहे. सकाळी 8 ते दुपारी 3 आणि दुपारी 3 ते रात्री 8 वाजेपर्यंतच्या दोन वेळांच्या सत्रामध्ये सर्वेक्षण केले जाणार आहे.
सर्वेक्षण करताना खासगी संस्थेद्वारे प्रत्यक्ष जागेवर जाऊन विक्रेत्याचे त्याच्या व्यवसायासह छायाचित्र घेतले जाईल. शिवाय आवश्यक माहिती शासनाच्या संगणकीय प्रणालीमध्ये तसेच पालिकेने विकसित केलेल्या नमुन्यामध्ये भरली जाणार आहे. मनुष्यबळ, सर्वेक्षण, माहिती जमा आणि अपलोड करणे, ओळखपत्र देणे, पथ विक्रेता प्रमाणपत्र देणे आणि आवश्यकतेनुसार दुरुस्त्या करणे ही जबाबदारी संस्थेची असणार आहे. यासाठीच्या खर्चास मंजुरी देण्यात आली.
प्रभाग क्रमांक 8 मधील जयगणेश साम्राज्य चौक ते क्रांती चौकापर्यंतच्या परिसरात पदपथावर रंगीत पेविंहग ब्लॉक बसविण्यात येणार आहे. यासाठी 1 कोटी 90 लाख खर्चास मान्यता देण्यात आली. औंध-सांगवी रस्त्यावरील मुळा नदीवरील 8 मीटर रुंदीच्या पुलाशेजारी 22 मीटर रुंदीचा पूल बांधण्यात येणार आहे. ते काम पुणे पालिका करीत आहे. पालिकेचा हिस्सानुसार 50 टक्के म्हणजे 20 कोटीची रक्कम देण्यास समितीने मान्यता दिली.
उद्यानांच्या देखभालीसाठी 5 कोटी
अ, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या विविध उद्यानांच्या देखभाल आणि संरक्षणासाठी 5 कोटी 28 लाख खर्च केले जाणार आहेत. कासारवाडी येथे सुमारे 1 कोटी 90 लाख खर्च करुन भाजी मंडई विकसित करण्यात येणार आहे.