सातारा – सातारा शहरामध्ये करोनाबाधितांच्या संख्येची वाटचाल द्विशतकाजवळ पोहचली आहे. शहरात एकूण 41 कंटेनमेंट झोनमधून बाधितांचा आकडा 194 वर पोहचला असून शुक्रवारी शहरात पाच रुग्ण नव्याने आढळून आले. शहरालगतच्या शाहुपुरी ग्रामपंचायत हद्दीतील गडकर आळीत पाच करोना रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा गतीमान झाली आहे.बाधितांमध्ये दोन महिला, एक पुरुष व दोन युवकांचा समावेश आहे.
सातारा शहराच्या हद्दीवर रेंगाळणारे करोनाचे संक्रमण मध्यवस्तीत पसरले असून कोणताही वॉर्ड करोनापासून मुक्त राहिलेला नाही. आता प्रवासापेक्षा अतिसंपर्कातील आणि लक्षणेविरहित करोनाचे रूग्ण आढळत असून पालिकेच्या आरोग्य यंत्रणेने स्त्रावाच्या नमुना चाचण्या वाढवल्या आहेत.
दररोज शंभरपेक्षा अधिक नागरिकांचे नमुने घेतले जात असल्याची माहिती पालिकेचे कोविड कक्ष प्रमुख प्रणव पवार यांनी दिली. गुरुवारी रात्री जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालानुसार भवानी पेठ येथे 28 व 21 वर्षीय दोन युवक, गोडोली येथे 23 वर्षीय पुरुष व 39 वर्षीय महिला व सदरबझार येथे 23 वर्षीय युवती बाधित झाली आहे.
गोडोली गावठाण व गोडोली त्रिशंकू भागात दोन रुग्ण बाधित आढळल्याने दोन स्वतंत्र कंटेनमेंट झोन तयार करण्यात आल्याचे प्रणव पवार यांनी सांगितले. यादोगोपाळ पेठेत 62 वर्षीय करोनाबाधित वद्धाचे नाव जिल्हा रुग्णालयाच्या यादीतच नव्हते. मात्र, पालिकेला त्या रुग्णाची आधीच माहिती मिळाल्याने आरोग्य विभागाने गुरुवारीच जुन्या कला वाणिज्य महाविद्यालयाच्या पिछाडीला कंटेनमेंट झोन तयार केला.
सातारा शहर व तालुका मिळून दिवसभरात 15 रुग्ण नव्याने आढळले आहेत. शहरात सध्या 41 कंटेनमेंट झोन तयार झाले आहेत. सातारा तालुक्यात विलगीकरण करण्यात आलेल्यांची संख्या 12148 असून 1879 जणांचे नमुने तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत “हाय रिस्क’मधील 378 रुग्ण बाधित झाले आहेत. त्यामुळे बाधित रुग्णांची सरासरी 35.87 टक्क्यांवर पोहचल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. जी. पवार यांनी सांगितले.